जळगाव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ९ सप्टेंबर रोजी पाचोऱ्यात येणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यात आता बदल झाला असून १० सप्टेबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (ठाकरे गट) जळगावात येणार आहेत. दोघं नेत्यांपैकी कोणाची सभा आधी होते हे अजून तरी निश्चित झालेले नाही.मात्र त्याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याने महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला जिल्ह्यातील तीन पैकी एकही मंत्री उपस्थित राहणार नाहीत हे जवळपास निश्चित झालेले आहे.
महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पुतळा साकारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. महापालिकेचा शासकीय कार्यक्रम असल्याने महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. भाजप नगरसेवकांनीही गिरीश महाजनांना विनंती केली होती, त्यामुळे तिघं मंत्री कार्यक्रमाला येणारच होते, मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी १० रोजी पाचोऱ्यात येत असल्याने तिघं मंत्री त्याच कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
कोण, कोणाला उत्तर देणार?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पाचोऱ्यात येणार होते व त्याच्या दुसऱ्याच दिवशी उध्दव ठाकरे यांच्याहस्ते जळगावात सरदार पटेल व शिवस्मारकाचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ठाकरे यांची वचनपूर्ती सभा होणार आहे. ९ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय बोलतात, त्यावर ठाकरेंना उत्तर देणे सोपं होते, ती वेळ येऊ नये म्हणून ९ रोजी दौरा रद्द करुन १० रोजीचा दौरा मुख्यमंत्र्यांनी निश्चित केला. त्याशिवाय शक्ती प्रदर्शनावर कुरघोडीचाही हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.