जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावातील पाचोऱ्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आज सगळीकडे असं वातावरण तयार केलं जातंय, जसं काय लोकांना काही कळतंच नाही. मोदी पूर्वी म्हणायचे, महागाई कमी झाली की नाही झाली...पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले...आता 'अब की बार' बस झालं. यांना 'आपटी बार' दाखवावाच लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, यावेळी त्यांनी उरी हल्ला आणि सत्यपाल मलिकांच्या गौप्यस्फोटावरही प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे आल्यावर काही जणांनी घोषणा दिल्या, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. मी नाही रे बाबा त्यांचा बाप. असल्या गद्दार औलादी आपल्या असूच शकत नाहीत. यांना स्वतःचं काही नाही. बाप चोरणारे आहेत हे. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते. हे ढेकणं तुमचं रक्त पिलेली ढेकणं आहेत. यांना मारायला फक्त एक बोट लागेल. आज माझ्याकडे काहीच नाही, त्यांनी शिवसेना नाव चोरले, धनु्ष्यबाण चोरले, माझे वडील चोरत आहेत. माझ्याकडे काहीच नसताना तुम्ही कसकाय आलात, तर तुम्ही काही घेणारे नाही, तर आशीर्वाद देणारे आहात. दोन-पाच इकडे तिकडे गेले असतील, पण हे लाखो लोक आमच्या बाजूने आहेत, असं ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणतात, तिकडे सत्यपाल मलिकांनी उरी हल्ल्याबाबत मोठी माहिती दिली. त्यांनी भ्रष्टाचाराची माहिती समोर आणली. त्यांच्या मागे सीबीआय लावली. काल-परवा काही जवान शहीद झाले. ते सोडून भाजप कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. आज विरोधकांच्या मागे सीबीआय, ईडी लावली आहे. भाजपात येता की, तुरुंगात जाता. आमच्यात असले की, ते भ्रष्ट असतात आणि तुमच्यात आले की शुद्ध होतात. सत्यपाल मलिक म्हणाले तसं, यांनी निवडणुकीसाठी जवान मारले असतील, तर अशा लोकांसाठी आपण आपले सुपूत्र यांच्यावर ओपाळून टाकायचे का? यांना किती दिवस चालवून घेणार? या भगव्यावर त्या चोरांचा अधिकार नाही. खंडोजी खोपडेच्या हातात भगवा शोधून दिसत नाही. यांना स्वतःच काही नाही, दुसऱ्यांच चोरावं लागतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणतात, राहुल गांधींनी अदानीवर प्रश्न विचारले, उत्तर कोण देणार? हा प्रश्न फक्त राहुल गांधांना नाही, तर देशातील प्रत्येकाला पडतोय. शेतकरी म्हणतोय, आम्ही दिवसभर राब-राब राबतो आणि हा मोदींचा मित्र लगेच इतका श्रीमंत होतो. मिंध्ये सरकार म्हणतात, आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. तुम्ही काय दिलं? मी घरात बसून सरकार चालवतो असं म्हणतात, हो आम्ही चालवलं. मी घरात राहून चांगलं सरकार चालवलं, तुम्ही बाहेर फिरुन चालवता येत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.