Uddhav Thackeray vs Gulabrao Patil | अजय पाटील: "शिवसेनेने जळगाव जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, आमदारांना प्रेम दिले. गुलाबराव पाटील यांना मंत्री केले, त्यांना बाळासाहेबांनीही प्रेम दिले, आम्ही ही प्रेम दिलं. मात्र, त्यांनी आम्हाला काटे दिले, आतापर्यंत गुलाबराव पाटलांनी आमचे प्रेम पाहिले आता काटे काय असतात ते दाखवा", अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले.
बुधवारी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, दीपक राजपूत, महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभुषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, वैशाली सुर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, पक्षावर आतापर्यंत अनेक संकट आली, मात्र या संकटात शिवसैनिकांनी नेहमी संघर्ष करुन शिवसेनेला उभे केले. आता ही संकट आले आहे, आमदार गेले मात्र शिवसैनिकांची ताकद आपल्यासोबत आहे. त्यामुळे ही लढाई आपल्याला जिंकायची असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील संघटनेवर लक्ष द्या- जिल्ह्यातील आमदारांनी बंडखोरी केली असल्याने पक्षाच्या संघटनेवर लक्ष देण्याच्या सूचना पक्ष प्रमुखांनी दिल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात बैठका, मेळावे, शाखा सुरु करून पक्ष बळकट करण्याचा सूचना पक्षप्रमुखांनी दिल्या. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांसाठी आतापासून कामाला लागून, संपर्क वाढवून, शिवसेनेची बाजू भक्कम व आक्रमकपणे राबविण्याच्या सूचना देखील ठाकरे यांनी दिल्या.