सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: जिल्ह्यातून चार आमदार गद्दारी करून गेलेत. येणाऱ्या काळात हे चारही आमदार संपलेले असतील, उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे नवीन पाच चेहरे आमदार झालेले असतील अशी भविष्यवाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी जळगावात केली.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे सकाळी पावणे बारा वाजता जळगावात दाखल झाले. पिंप्राळा येथे शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी येथील एका हॉटेलमध्ये दानवे यांना पत्रकारांनी छेडले.
उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसण्याचा व दगडफेक करण्याचा इशारा शिंदे सेनेने दिला होता, यावर बोलताना दानवे यांनी सभेत घुसणारे हात आता गद्दारीचे व खोक्यांचे झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यात चार आमदार गेल्यानंतरही शिवसैनिकांमध्ये असलेला उत्साह आगामी काळात बदलाचे मोठे संकेत देत आहेत. जळगावचा वारसदार कोण असेल, यावर बोलताना त्यांनी उद्धव साहेब सांगतील तेच जळगावचे वारसदार असतील असे स्पष्ट केले. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत व शिवसेनेचे पदाधिकारी एका हॉटेलमध्ये थांबून आहे. 12 40 वाजता उद्धव ठाकरे यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे.