जळगाव : 'कुणी राजकारण करावं की नाही करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माणसाला हृदयातून कुणी डावलू शकत नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा आहे', अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला.महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभाला हजेरी लावल्यानंतर ते अजिंठा विश्रामगृहात खरीप आढावा बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्तीवरून सध्या राज्याच्या राजकारणात खल सुरू आहे. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या वाटेतील अडचण लक्षात घेऊन भाजप राजकारण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जळगावात या विषयावर बोलताना भाजपला चिमटा काढलाय.
*आमचा नेता एकच* गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आमच्याकडे एकच नेता आहे. तो नेता जे बोलतो, तेच आम्ही पण बोलत असतो. म्हणूनच या विषयावर आतापर्यंत शिवसेनेकडून कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बाब माझ्या अखत्यारितील नाही. मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती करावी, अशी मागणी महाविकास आघाडीची आहे. त्यानंतर राज्यपालांनी निवडणूक जाहीर करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करणे, यात तांत्रिक मुद्दे आहेत की राजकारणाचे किंवा डावलण्याचे मुद्दे आहेत? हे मला माहिती नाही. या विषयाबाबत जे काही सुरू आहे, ते आपण पाहत आहातच, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.