जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक केलेले माजी महापौर ललित विजय कोल्हे तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत आहे.खुबचंद साहित्या यांच्यावर १६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता गोरजाबाई जिमखान्याजवळ प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला ललित कोल्हे, राकेश चंदू आगरिया, नीलेश उर्फ बंटी नंदू पाटील, नरेश चंदू आगरिया, गणेश अशोक बाविस्कर व भाजप नगरसवेक प्रवीण रामदास कोल्हे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. यातील राकेश व नीलेश यांना २१ जानेवारी रोजी, नरेश व गणेश यांना २२ जानेवारी रोजी, नगरसेवक प्रवीण कोल्हे यांना २० एप्रिल रोजी अटक झाली. या प्रकरणातील मुख्य संशयित ललित कोल्हे फरार व गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असल्याने न्यायालयाने पाचही जणांचे अर्ज फेटाले होते.श्रद्धा कॉलनीत आल्याची माहिती मिळताच अटकगुन्हा घडल्यापासून ललित कोल्हे फरार होते. गुरुवारी रात्री महाबळ परिसरातील श्रध्दा कॉलनीत सरिता माळी यांच्या घरी आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक निरीक्षक नीता कायटे व इतरांच्या पथकाने माळी यांच्या घराला घेरले असता कोल्हे गच्चीवर लपून बसलेले होते. तेथून पोलिसांनी अटक करुन जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी गुरुवारी न्या.ए.एस.शेख यांच्या न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर केला. त्यात कोल्हे तपासात सहकार्य करीत नाही, उडवाउडवीचे उत्तरे देत असून गुन्ह्यातील रिव्हॉल्वर व दोन कार हस्तगत करण्याचे कारण सांगून पोलीस कोठडीची मागणी केली. तपासाधिकाऱ्यांचा रिपोर्ट व सरकारी वकील स्वाती निकम यांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने कोल्हे यांना ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
ललित कोल्हे यांच्याकडून तपासात उडवाडवीचे उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:09 PM