पहूर/ फर्दापूर/ जळगाव : गोसेगाव, ता.सिल्लोड येथून बारावीचा पेपर आटोपून घरी येत असताना उमाळा, ता.जळगाव येथील दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करणाºया कारने समोरून धडक दिल्याने त्यात अक्षय युवराज पाटील (वय २५) हा जागीच ठार झाला तर पवन ज्ञानेश्वर पाटील (वय २२) हा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी वाकोद व फर्दापूर दरम्यान एका हॉटेलजवळ घडली.अक्षय व पवन या दोघांनी गोसेगाव येथील महाविद्यालयात बारावीला प्रवेश घेतला होता. त्यामुळे परीक्षेसाठी ते दररोज तेथे दुचाकीने जात होते. शुक्रवारी इतिहासचा पेपर दिल्यानंतर दोघेही दुचाकीने (क्रमांक- एमएच १९/ बीयू ०४३८ ) घरी येत असताना फर्दापूर व वाकोद गावाच्या दरम्यान औरंगाबादकडे जाणाºया कारने (क्रमांक-एमएच १२- झेड ०३७२) ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. त्यात अक्षय हा जागीच ठार झाला. तर पवन हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जळगाव बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील हे दोघांच्या नातेवाइकांना घेऊन तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथून दोघांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. अक्षय याच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. कंपनीत काम करून तो शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.दरम्यान, या अपघाताची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नीलेश घोरपडे आणि सहकारी करीत आहेत.
उमाळ्याचा विद्यार्थी ठार, दुसरा जखमी
By admin | Published: March 04, 2017 12:56 AM