लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रस्सीखेच आणि ज्युदो या दोन खेळांना काही वर्षांपूर्वी फारसा वाव नव्हता. मात्र हळूहळू या संघटनांनी स्थानिक क्रीडा क्लबच्या सहाय्याने आपले पाय रोवले आणि २००६ ते २०२१ या वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त रस्सीखेचचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत. त्यात मोठा वाटा आहे तो प्रा. उमेश नारायण पाटील यांचा.
उमेश नारायण पाटील यांनी २००९ पासून मुलांना रस्सीखेचचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत भारताच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून स्थानदेखील मिळाले. त्यांनी नीरज गायकवाड, आझाद पटेल, मोहन पांडे, संदीप पाटील, प्रशांत माळी, अतुल गोरडे, संजय शिंदे या सारखे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विजेते खेळाडूदेखील घडवले.
रस्सीखेच सोबतच त्यांनी ज्युदोतही काम केले. अनिकेतन खोडके, शुभांगी महाजन या सारख्या ज्युदोपटूंना तयार करण्याचे काम त्यांनी केले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्युदो संघाच्या प्रशिक्षक म्हणून सलग चार वर्षे ते काम पाहत होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्पर्धाच झाल्या नाहीत.
उमेश पाटील हे सध्या रावेर येथील व्ही.एस. नाईक महाविद्यालयात क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबतच जळगाव शहरात स्टेडिअम तसेच विविध ठिकाणी मुलांना ज्युदोचे प्रशिक्षणदेखील देत असतात.
उमेश यांनी आतापर्यंत ज्युदो आणि रस्सीखेचमध्ये ५० पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत.
खेळाडू म्हणून देखील शानदार कामगिरी
२००६ ते २००९ या काळात पाच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यानंतर ते प्रशिक्षणाकडे वळले.
कोट - गेल्या वर्षभरापासून क्रीडा स्पर्धा बंद आहेत. तसेच खेळांचे प्रशिक्षण आणि सरावदेखील बंद आहे. त्यामुळे आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आम्ही विविध ऑनलाइन उपक्रम राबवत आहोत. त्याचा फायदा मुलांना होत आहे. काही दिवस आधीच खेळांशी संबंधित राष्ट्रीय वेबिनारदेखील घेतला होता. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला. - प्रा. उमेश पाटील