लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तो अवघा साडेपाच वर्षाचा...वडिलांच्या निधनाचे अश्रू अजूनही त्याच्या डोळ्यात दाटलेले...मात्र शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ति...त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती...आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेला मदतीचा धनादेश हाती घेत तो म्हणाला, 'काका...मी खूप शिकेन, वडिलांचे स्वप्न पूर्ण करेन...' वाकडी येथील शहिद अमित पाटील यांचा सुपूत्र भूपेश याचे हे बोल ऐकून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. प्रजासत्ताकदिनी आमदारांनी वीर जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांना शैक्षणिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
वाकडी येथील रहिवासी व सीमा सुरक्षा दलातील शहिद जवान स्व. अमित साहेबराव पाटील हे महिनाभरापूर्वी कर्तव्यावर असताना वीरगतीस प्राप्त झाले. त्यांचा साडेपाच वर्षीय मुलगा भुपेश अमित पाटील याचे शैक्षणिक पालकत्व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वीकारत असल्याचे वचन दिले होते. त्यानुसार प्रजासत्ताक दिनी आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर्षीचा शैक्षणिक फी साठीचा धनादेश स्व. अमित पाटील यांच्या परिवारास सुपुर्द केला.
फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी-झोपे यांनी शहिद जवान अमित पाटील यांच्या परिवारातील सदस्यांचा अपघात विमा उतरवला असून आमदारांच्या जनसेवा कार्यालयात विमा पॉलिसीचे पेपर शहिद जवान अमित पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांना देण्यात आले. यावेळी अमित पाटील यांचे वडील साहेबराव पाटील, आई सखुबाई पाटील, भाऊ योगेश पाटील उपस्थित होते. वीर जवान अमित पाटील यांच्या परिवाराच्या पाठीशी यापुढेही नेहमीच भक्कम उभे राहून प्रत्येक अडीअडचणीला साथ देऊ, असे आश्वासन मंगेश चव्हाण यांनी दिले.
यावेळी पं. स. माजी सभापती व विद्यमान गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष नगरसेविका संगिता गवळी, इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, राहुल पाटील, विकास गोसावी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.