चाळीसगाव, जि.जळगाव : अनुवादक विकास शुक्ल यांच्या ‘मोपासांच्या सर्वश्रेष्ठ कथा खंड १’ या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.गी द मोपासा या गेल्या शतकातील जगप्रसिद्ध फ्रेंच कथाकाराच्या सर्वश्रेष्ठ कथांचा मराठी अनुवाद लेखक शुक्ल यांनी केला आहे.यापूर्वी त्यांची ‘शय्यागृहात’ आणि ‘गॉड फादर’ ही दोन भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. अध्यक्षस्थानी मसापचे विभागीय सचिव प्राचार्य तानसेन जगताप होते. विशेष अतिथी म्हणून रोटरी प्रांतपाल राजीव शर्मा, इनरव्हील प्रांतपाल गौरी धोंड, प्रदीप देशमुख, वसंतराव चंद्रात्रे, आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष आशालता चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.मनोगतात डॉ.श्रीपाद जोशी यांनी विकास शुक्ल यांच्या भाषांतर कौशल्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. जर पात्रांची आणि जागांची नावे फ्रेंच नसती तर या कथा भाषांतर नसून स्वतंत्र वाटाव्यात इतके हे पुस्तक अप्रतिम आणि निर्दोष आहे, असे ते म्हणाले. मोपासा, सात्र, काफ्का, कामू या सर्व लेखकांनी जागतिक कथाविश्वाला मार्गदर्शन केले आहे. मराठी लेखकालासुद्धा प्रभावित केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारने अकॅडमी स्थापन करून जागतिक साहित्य मराठीत अनुवाद होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. म्हणजे विकास शुक्ल यांच्यासारख्या लेखकांना स्वत: प्रकाशक होण्याची वेळ येणार नाही, अशी त्यांनी मागणी केली. राजीव शर्मा, गौरी धोंड, उन्मेष पाटील यांनीही व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. केकी मूस यांच्याकडून भाषांतराची प्रेरणा मिळाल्याचे विकास शुक्ल यांनी सांगितले. यापुढे मोपासाच्या कथांचा दुसरा खंड तसेच चेखोव या रशियन लेखकाच्या कथा भाषांतरित करणार असल्याची घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.पुस्तकातील ‘द वेडिंग गिफ्ट’ या कथेचे अभिवाचन माधुरी वैद्य-कुलकर्णी आणि डॉ. मुकुंंद करंबेळकर यांनी सादर करून कथेतील नाट्य जिवंत उभे केले. प्रास्ताविक जुलेखा शुक्ल यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण गंगापुर यांनी केले.
‘मोपासांच्या सर्वश्रेष्ठ कथा खंड-१’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 3:26 PM