पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट
धरणगाव : ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी खोदकामात ब्रिटिशकालीन दोन शिलालेख आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूला पडून होते. ग्रामीण रुग्णालय येथे सध्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू असून, या कामाचे ठेकेदार व इतिहासाचे अभ्यासक उज्ज्वल पाटील यांना हे शिलालेख निदर्शनास आले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तत्काळ दखल घेत पुरातत्त्व विभाग औरंगाबाद यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. औरंगाबाद
विभागाच्या सदस्यांनी रविवार, ४ जुलै रोजी याठिकाणी भेट दिली. पुरातत्त्व विभाग औरंगाबाद येथील भुजंगराव बोबडे, राज्य कर सहायक आयुक्त समाधान महाजन, इतिहास अभ्यासक सुशीलकुमार आहेरराव, धरणगावचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, उज्ज्वल पाटील यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
धरणगाव येथे ब्रिटिशांची मुख्य वसाहत होती. ब्रिटिशांच्या कंपन्या होत्या. याठिकाणी आढळलेल्या दोनपैकी एका शिलालेखावर इंग्रजी आणि
दुसऱ्या शिलालेखावर मराठी या दोन्ही भाषांत माहिती लिहिलेली आढळून आली आहे.
ब्रिटिश काळात लेफ्टनंट सर जेम्स औट्रम हे ब्रिटिशांचे सेनापती होते. त्यांचा उल्लेख यावर दिसून येतो. औट्रम यांनी धरणगाव येथे भिल्ल बांधवांच्या तुकड्यांची स्थापना केली. सध्याचे ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाण हे तेव्हा जिल्हा कार्यालय होते. १८२५ ते १८३५ या १० वर्षांच्या कालावधीत औट्रम हे धरणगाव येथे राहायचे. धरणगाव येथील कार्यामुळे त्यांना संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली. ‘बेयर्ड एक निष्कलंक आणि निर्दोष सरदार’ ही एक मोठी मानली जाणारी पदवी औट्रम यांना मिळाली होती. या पदवीचा उल्लेख या शिलालेखावर करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत हे शिलालेख कचऱ्यात धूळखात पडलेले असून, या शिलालेखांचे जतन करण्याची गरज असल्याचे मत उज्ज्वल पाटील यांनी व्यक्त केले. प्रसंगी त्यांनी शहरातील काही जुन्या ठिकाणांना देखील भेट दिली.