लोकमत न्यूज नेटवर्क
मेहुणबारे, ता.चाळीसगाव : घरात करणी असल्याचे सांगत जादूटोणाच्या नावाखाली घरात प्रवेश करून पत्नीचा आजार बरा करण्याचे सांगत ६० हजार रुपये किमतीच्या मंगळसूत्रासह रोख ५० हजार रुपये व औषधोपचार आणि कुंडल्या काढण्यासाठी ४ हजार २०० रुपये असा एकूण १ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाऱ्या जामनेर येथील दोघा भामट्यांना मेहुणबारे पोलिसांनी केवळ मोबाइलच्या लोकेशनवर जेरबंद केले आहे. या भामट्यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोंढे येथील शेतकरी जितेंद्र भीमराव भोसले यांच्या पत्नीला चार वर्षांपासून संधीवाताचा त्रास होत आहे. विविध दवाखान्यांमध्ये नेऊनही त्यांच्या प्रकृतीत फरक पडला नाही. भोसले हे दि. ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासह घरात असताना दोन व्यक्ती आले व जोशी ब्राह्मण असल्याचे सांगत, तुमच्या घराची दिशा आम्हाला बरोबर दिसत नसून, तुम्हाला काही पूजा करावयाची असेल, तर आम्ही करून देऊ, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरात बोलावले. घरात येताच दोघांनी घराच्या सर्व दिशांना पाहून तुमच्या घरात दोष असून, कोणीतरी करणी केली आहे, असे सांगितले.
भोसले यांच्या पत्नीने त्यांना मुलांबाबत विचारले असता, मुलगा खूप चिडचिड आणि आगावू असल्याचे तर दुसरा मुलगा घराचे नाव करेल, असे सांगितले. दोन्ही मुलांच्या कुंडल्या मागविल्या. मात्र, या कुंडल्या चुकीच्या असून, मी तुम्हाला दोन्ही मुलांच्या कुंडल्या काढून देतो, असे सांगत पत्नीच्या संधीवातावरही औषध असून, तीन दिवसांत आजार पूर्ण बरा करून देण्याचे आश्वासन दिले. कुंडली काढण्याचे दोनशे रुपये, तसेच संधीवाताच्या औषधाचे चार हजार रुपये असे ४ हजार २०० रुपये त्यांनी उकळले. जाताना व्हॉट्सॲप नंबरही दिले.
दोघे भामटे दि.१ एप्रिल, ५ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी पुन्हा भोसले यांच्या घरी आले व देव्हाऱ्यापाशी पत्नीची मंत्रतंत्र म्हणून पूजा करून तुम्हाला बाहेरचे झाले आहे, पूर्व दिशेची विधवा काळ्या रंगाची बाई आहे. तिची भूतबाधा तुम्हाला उतरायची असेल, तर २१ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. मात्र, एवढे पैसे देण्यासाठी नाही, असे सांगितले असता, तडजोड करून एक हजार रुपयात पूजा करण्याचे ठरविले व एक हजार रुपये ते घेऊन गेले.
दि. ८ रोजी सकाळी १० दोन्ही जोशी पुन्हा घरी आले व भोसले यांच्या पत्नीव्यतिरिक्त घरातील सर्व लोकांना घराबाहेर काढून देव्हाऱ्याजवळ जाऊन त्यातील एकाने भोसले यांच्या पत्नीची पूजा केली, तर दुसऱ्या जोशीने एका वाटीत कुंकवाचे पाणी केले व त्यात लिंबू पिळून भोसले यांच्या पत्नीचे १३ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत कुंकवाच्या पाण्यात टाकली. त्यावर स्टील प्लेट ठेवून ती देव्हाऱ्याखाली ठेवली. भोसले यांच्या पत्नीला हातात तांदूळ देऊन जवळच्या चौकात गोल फेरी मारून येण्यास सांगितले.
सायंकाळपर्यंत देव्हाऱ्याखाली ठेवलेल्या वाटीतील पाणी पिवळे होईल व लिंबू लाल रंगाचे होईल. त्यानंतर, तुम्ही सोन्याची माळ काढून घ्या, असे सांगत हे दोघे निघून गेले. सायंकाळी देव्हाऱ्याखाली ठेवलेली वाटी बाहेर काढली असता, त्यात सोन्याची मंगलपोत गायब असल्याचे लक्षात आले. दोघा जोशींनी फसवणूक करून ६० हजार रुपये किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व घरातील डब्यात ठेवलेले ५० हजार रुपयेही गायब दिसून आले.
मुलीचा चाणाक्षपणा अन् जोशी अडकले जाळ्यात
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, जितेंद्र भोसले यांच्या मुलीने चाणाक्षपणा दाखवत मैत्रिणीच्या मोबाइलवरून त्या दोघा जोशींच्या मोबाइलवर संपर्क केला व आम्हालाही पूजा करायची असल्याचे सांगितले. त्यांचा मोबाइल सुरू असल्याने, तत्काळ या फसवणुकीची माहिती मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना माहिती दिली. देसले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघा भामट्यांचे मोबाइलचे लोकेशन कुठे आहे, याचा शोध घेतला असता, ते भामटे पहूर (ता. जामनेर) येथे असल्याची माहिती मिळाली. मेहुणबारे पोलिसांनी वेळ न दडवता, तत्काळ पहूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व पहूर पोलिसांच्या मदतीने दोघांपैकी एकाला ताब्यात घेऊन मेहुणबारे पोलीस ठाण्यात आणले. ताब्यात घेतलेल्या भामट्याचे नाव विजय शालीकराम जोशी असे असून, त्याच्या फरार असलेल्या साथीदाराचे नाव दिगंबर जोशी असल्याचे व ते दोघे जामनेर तालुक्यातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले. फरार असलेल्या डिगंबर जोशी यासही आज रोजी पोलिसांनी अटक केली.