जळगाव : ‘मी आर्मीत असून, फ्लॅट भाड्याने घेण्यास इच्छुक आहे,’ असे सांगून घरमालकाची २४ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय रामकृष्ण भाटिया (५२) हे शिरसोडी रोड येथील रहिवासी आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील मोदीपुरम मेरठ येथील फ्लॅट भाड्याने द्यायचा असल्याची जाहिरात त्यांनी एका संकेतस्थळावर दिली होती. जाहिरात पाहून रणदीप सिंग नावाच्या व्यक्तीने भाटिया यांच्याशी संपर्क साधला. ‘मी आर्मीत नोकरीला असून, तुमचा फ्लॅट भाड्याने घेण्यास इच्छुक आहे,’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर ‘१२ हजार रुपये भाडे मान्य असून, हे पैसे तुमच्या बँक खात्यावर भरण्यास तयार आहे. पण, त्याआधी तुम्ही माझ्या बँक खात्यात १२ हजार रुपये ट्रान्सफर करा. मला पैसे मिळाल्यावर तुम्हाला परत करेन,' असे सांगितले. भाटिया यांनी त्याला १२ हजार पाठविले, नंतर आणखी १२ हजार पाठविले. मात्र, रणदीप सिंग याने पुन्हा २५ हजाराची मागणी केल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळाले. त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली व २४ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी रणदीप सिंग याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.