चाळीसगाव नगरपालिकेत सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली. ‘न भूतो न भविष्यती’ अशा अनेक महत्त्वाच्या योजनांना भाजप सरकारच्या काळात मंजुरी मिळून नगरपालिकेच्या खात्यात तो निधी जमा झाला; परंतु केवळ नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि काही नगरसेवकांच्या आडमुठेपणामुळे भुयारी गटार योजना यासह इतर योजना खोळंबल्या होत्या. ११ सप्टेंबर २०१९ रोजी चाळीसगाव शहरातील भुयारी गटार (मलनिस्सारण प्रकल्प) योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ६८.४४ कोटींच्या कामाची वर्कऑर्डर मिळाली.
कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर जाणीवपूर्वक काही नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणत काम बंद पाडले. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा प्रकल्प पूर्ववत करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या ठोस निर्णय क्षमतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काम सुरू करण्यासंदर्भात पुन्हा निर्णय दिला आणि अखेर कामाचा शुभारंभ झाला, असे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान शहराच्या विकासात महत्त्वाची असलेली भुयारी गटार योजना पुन्हा सुरू झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सगळ्यांच्या सहकार्याने हे काम सुरळीत पडेल, अशी अपेक्षा यावेळी नगरसेवक पाटील यांनी व्यक्त केली.
===Photopath===
240521\24jal_11_24052021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक १मध्ये भुयारी गटारीच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, सोबत विजया पवार व इतर