जळगाव : यावल येथे सराफ दुकानात भरदिवसा पिस्तुलचा धाक दाखवून लुटलेले ११ लाख २६ हजार ६७५ रुपये किमतीचे सोने नकली (बेंटेक्स) निघाले असून, लुटारूंनीही डोक्याला हात मारून घेतला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुकेश प्रकाश भालेराव (रा.भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फैजपूरनजीकच्या भोरटके जंगलातून ताब्यात घेतले, तर रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील अमरसिंग बारेला हा एकमेव संशयित आता फरार आहे.
या गुन्ह्यातील निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय ३१, रा.कांदीवली, मूळ रा.रामनगर कन्नड, जि.औरंगाबाद) याला नवी मुंबईतून तर दुसरा साथीदार चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी), रा.भुसावळ याला जामनेरातून अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झालेली आहे. यावल येथे ७ जुलै रोजी दरोडा टाकल्यानंतर, सर्व संशयित भुसावळपर्यंत सोबत आले व तेथून सर्व जण विभागले गेले. निवृत्ती मुंबईत गेला व तेथे कांदिवलीत सुरक्षारक्षकाची नोकरी करायला लागला होता. चंद्रकांत हा भुसावळ येथून जामनेरपर्यंत तोंडाला रुमाल बांधून पायी चालत आला होता.
दारूच्या अड्ड्यांवर केले खबरे तयार
मुकेश भालेराव हा मद्याचा शौकीन आहे. गुन्हा केल्यानंतर खास करून तो जंगलात वास्तव्यास असतो व तो फैजपूरमधील भोरटेक जंगलात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे रणजीत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार, सहायक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, विनोद पाटील, किशोर राठोड व रणजीत जाधव यांच्या पथकाने फैजपूर व परिसरात मद्याची विक्री करणाऱ्यांनाच खबरे बनविले. तो कोणाकडे तरी मद्य घ्यायला येईलच, ही खात्री असल्याने पथकाने या भागात सापळा लावला. भोरटेक भागातून शनिवारी मद्य घेऊन तो जंगलात गेल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला हेरले. त्याच्याजवळ सतत शस्त्र असते, याची माहिती असतानाही पथकाने धोका पत्करला. दरम्यान, या गुन्ह्यातील सोने जप्त करण्यात आले आहे.
सावकाराला लुटल्याच्या गुन्ह्यात फरार असताना केली लूट
मुकेश भालेराव याने साकेगाव येथे एका सावकाराला पिस्तुलाचा धाक दाखवून २० हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी व सोनसाखळी लुटली होती. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत असतानाच, त्याने यावल येथे पिस्तुलाचा धाक दाखवून सराफ दुकान लुटल्याचा गुन्हा केला. दरम्यान, या आधीही त्याने भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या घरावर गोळीबार केला होता. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस प्रशासनाने त्याचा एमपीडीएचाही प्रस्ताव तयार केल्याची माहिती मिळाली.