दोघांना दिल्लीतून अटक : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
जळगाव : एचडीएफसी बँकेचा बनावट लोगो व कागदपत्रे तयार करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडविणाऱ्या दिल्ली, उत्तर प्रदेशच्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यातील अभय शिवजी तिवारी (रा. दिल्ली) व वचन बालमुकुंद शर्मा (रा. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) या दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटकेतील दोघांसह इतरांनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून मंजीत प्रल्हाद जांगीड (वय ३०, रा. विद्युत नगरी, महाबळ) या तरुणाशी संपर्क साधून नोकरी डॉट.कॉम या वेबसाइटचा वापर करून मंजीतच्या ईमेलवर एचडीएफसी बँकेचा लोगाे असलेली बनावट कागदपत्रे पाठविले. भावना, विकास जैन, अनन्या गुप्ता व स्वाती शर्मा आदी नावांचा त्यांनी वापर करून नोकरी देण्याचे आमिष दाखविले व त्यासाठी वेगवेगळ्या बँकेत ६४ हजार ५७४ रुपये ऑनलाइन स्वीकारले. पैसे गेले व नोकरीही लागली नाही, त्याशिवाय संपर्क करणारे व्यक्तीही संपर्काच्या बाहेर गेल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर जांगीड याने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिल्लीत दोन दिवस लावला सापळा
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी असे गुन्हे कुठल्याही परिस्थितीत उघड करण्याचा चंग बांधून पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना तसे सूचनावजा आदेशच दिले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक अभ्यास करून संशयितांची कुंडली काढली. त्यानंतर हिरे यांनी उपनिरीक्षक अंगद नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, अरविंद वानखेडे, दीपक सोनवणे व गौरव पाटील यांचे पथक दिल्लीला रवाना केले. तेथे पथकाने दोन दिवस सापळा लावला. स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे यांनीही तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांची माहिती पुरविली. त्यानुसार या पथकाने दोघांना अटक केली. जळगावात आणल्यावर न्यायालयात हजर केले असता १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.