लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या श्री हनुमान वाड्यातील एक ३२ वर्षीय विवाहित युवकाने जुन्या घरी वरच्या खोलीत रात्री गळफास घेऊन तर गांधी चौक भागातील एका ४२ वर्षीय विवाहित युवकाचा रावेर - निंभोरा रेल्वे मार्गावरील अजंदे रेल्वेगेटच्या पुढे धावत्या रेल्वेगाडीच्या धडकेने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
शहरातील सरदारजी शॉपीिग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ‘हर्ट-टच’ सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफर व व्हिडिओ एडीटर असलेल्या गणेश महाजन यांचा धाकटा भाऊ प्रमोद जगन्नाथ महाजन (३२, हनुमान वाडा, रावेर) हा पत्नी व थोरल्या वहिणी या पातोंडा (म. प्र.) येथे त्यांच्या धाकट्या बहिणीच्या साखरपुड्यानिमीत्त गेल्या होत्या. जुन्या राहत्या घरी नेहमीप्रमाणे रात्री झोपण्याकरीता गेला असता घरी एकटाच असल्याची संधी साधून त्याने जुन्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत छताच्या कडीस दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी प्रमोद लवकर घरी न परतल्याने वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने व पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाल्याच्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचे समजते. आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व एक वर्षांचा चिमुरडा प्रणय असा संसार उघड्यावर पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील मनसेचे तालूकाप्रमुख संदीपसिंग राजपूत यांचे थोरले बंधू व रावेर न. पा.च्या घंटागाडीवरील रोजंदारीवरील वाहनचालक निलेशसिंग दरबारसिंग राजपूत (४२, गांधी चौक, रावेर) यानेही रोजगाराच्या शोधात भटकंती करीत असताना धावत्या रेल्वेगाडीची धडक लागून अकस्मात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेपूर्वी रावेर रेल्वे स्थानक ते निंभोरा स्थानकांदरम्यानच्या अजंदे-विवरे रेल्वे गेटनजीकच्या खंबाा क्रमांक ४७५जवळ घडली. रावेर रेल्वे स्थानक अधिक्षक राजेशकुमार यादव यांनी दिलेल्या खबरीवरून, रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत निलेशसिंग राजपूत याच्या खिशात आढळून आलेल्या मोबाईलवरून पो. हे. कॉ. अर्जुन सोनवणे व पो. ना. अजय खंडेराव यांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे पत्नी व लहानगा १४ वर्षीय मुलगा असा कोवळा संसार उघड्यावर पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
दोन्ही युवकांचा संसार उघड्यावर
शासनाने कोरोनाच्या साथरोगातील ‘ब्रेक- दी- चेन’ च्या लागू केलेल्या मिनीलॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पहाटे उघडकीस आल्याने शहरात एकच शोककळा पसरली. कोरोना साथरोगाच्या लॉकडाऊनपासून उसळलेल्या बेरोजगारीच्या भस्मासुरामुळे या दोन्ही बेरोजगार युवकांचा आपला संसार उघड्यावर पडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.