जळगावच्या माउलीचे अनोखे दातृत्व, मध्य प्रदेशात आश्रमासह उघडले अन्नछत्र!
By अमित महाबळ | Published: March 31, 2023 07:41 PM2023-03-31T19:41:28+5:302023-03-31T19:41:36+5:30
बर्फानी बाबांसह अनेकांची आश्रमाला भेट
जळगाव :जळगावच्या एका माउलींची अनोखी गुंतवणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. अनेक वर्षांच्या सेवेनंतर अर्थातच भरपूर फंड मिळाला, पेन्शन लागू झाले; पण त्यांनी हा सगळा पैसा इतर कुठेच न वळवता मध्य प्रदेशातील नर्मदा किनारी आश्रम उभारण्यासह ‘श्रीपाद श्रीवल्लभ अनघा दत्त अन्नछत्रा’साठी खर्च करीत आहेत. परिक्रमावासीयांची सेवा तर घडावीच; पण नर्मदा परिक्रमा मार्गात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे स्थान असावे हा उद्देश यामागे आहे.
जळगावलाच माहेर व सासर असलेल्या विद्या मुजुमदार २०१७ मध्ये भुसावळ येथील श्री संत गाडगे महाराज कॉलेजच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी सांगितले की, निवृत्तीवेळी मिळालेल्या पैशांचे काय करायचे, हा प्रश्न बरेच दिवस होता. दरम्यान, प्रभू दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ (पीठापूर) यांचे स्थान नर्मदा परिक्रमेत असावे असा विचार मनात आला. कुटुंबीयांची संमती मिळताच ओंकारेश्वरच्या जवळ मोरटक्का येथे स्टेशनसमोर ४२०० स्के.फू. जागा खरेदी करून आश्रम बांधला.
२०२२ मध्ये दिवाळीनंतर तो खुला करण्यात आला. तेथे श्रीपाद श्रीवल्लभ अनघा दत्त अन्नछत्र उघडण्यात आले असून, नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना महाप्रसाद व निवासाची मोफत सोय केली जाते. नर्मदा परिक्रमेची माहिती सांगितली जाते. आश्रमासाठी अजय करंदीकर (इंदूर), डॉ. प्रवीण ठाकूर (जळगाव), सुयोग रानडे (अकोला), दिनेश जोशी (भुसावळ) यांचे सहकार्य लाभले. आश्रमाच्या मागे दत्तकुटी बनवली असून, श्रीपाद श्रीवल्लभ व भक्तराज महाराज, रामानंद महाराज (इंदूर) यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. नर्मदा परिक्रमावासी आश्रमात कन्या भोजन घालतात. नर्मदा जयंती, दत्त जयंती व वसंत पंचमी उत्सव साजरे होतात, असेही मुजुमदार यांनी सांगितले.
पेन्शन, वकिली व्यवसायातून करतात खर्च
- अन्नछत्राचा लाभ दोन ते अडीच हजार भाविकांनी घेतला आहे. पोटभर वरण-भात, भाजी, पोळी व एक गोड पदार्थ अन्नछत्रात दिला जातो. याचा खर्च विद्या मुजुमदार यांचे पेन्शन आणि पती ॲड. मधुसूदन मुजुमदार यांच्या वकिली व्यवसायातून होतो. मुलगा वेदांत हाही वकील आहे. या तिघांनी नर्मदा परिक्रमा केली आहे.
- आश्रमातील अन्नछत्रासाठी लागणारी डाळ, तांदूळ व इतर सर्व शिधा जळगावहून नेला जातो. सात महिने पुरेल एवढे साहित्य गाडी भरून घेऊन जातो, असे ॲड. मधुसूदन मुजुमदार यांनी सांगितले.
बर्फानी बाबांसह अनेकांची आश्रमाला भेट
विमलेश्वर महादेव निवासी १६० वर्षांचे बर्फानी बाबा, गुप्ते महाराज (सातारा), शरणम महाराज (हरिद्वार), भक्तराज महाराज व प.पू. रामानंद महाराज आश्रम (इंदूर) ट्रस्टचे अध्यक्ष शरद बापट व ट्रस्टी, रामप्रभू महाराज (नाशिक), हेमंत कसरेकर (श्रीक्षेत्र कांदळी, जुन्नर) यांच्यासह अनेकांनी आश्रमाला भेट दिली आहे.