जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, सातत्याने घटणारी जैवविविधता, जमिनीची धूप, वैश्विक तापमान वाढ, अनियमित पर्जन्यमान या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोरोना काळात लॉकडाऊन असताना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, स्वयंसेवक ज्या ठिकाणी आहेत़ त्या ठिकाणी सभोवतालच्या परिसरात, शेतात, माळरानात, मोकळ्या जागेत, महाविद्यालयाच्या प्रांगणात अथवा कोणी आक्षेप घेणार नाही अशा जागेवर पाच तासात तब्बल १२ हजार ९७७ रोपांची लागवड करण्यात आली.या उपक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी. पी. माहुलीकर, कुलसचिव प्रा.डॉ. बी. व्ही. पवार, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिलीप पाटील, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे आदी मान्यवरांनी सपत्नीक वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात केली.राहत असलेल्या परिसरात लागवडकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांच्याबरोबर वृक्षारोपण केले. ज्या विद्यार्थी, स्वयंसेवकांना वेळेअभावी रोपे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांनी आपल्या परिसरात आंबा, जांभूळ, कडुलिंब, रामफळ, सिताफळ, तुळशी, आदींच्या बियांचे बीजारोपण करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.पजिओ टॅगिंगद्वारे फोटो काढून नोंदउपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. विजय मांटे, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. वाल्मीक आढावे, नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम व तिन्ही जिल्ह्यांचे विभागीय समन्वयक प्रा . अनिल सावळे (भुसावळ विभाग), डॉ. गणपत ढेंबरे (रावेर विभाग), डॉ. संतोष खिराडे (जळगाव विभाग), प्रा. जे.बी . पाटील (पारोळा विभाग ), डॉ. किशोर पाठक (चोपडा विभाग), डॉ. बी . एस. पाटील , डॉ. संदीप गरुड (शहादा विभाग), डॉ. प्रवीण महाले (धुळे उत्तर विभाग), डॉ. अनिल सोनवणे (शिरपूर विभाग), डॉ. सचिन नांद्रे (साक्री विभाग) यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाच्या नियोजनामध्ये विभागीय समन्वयक डॉ. प्रवीण महाले व डॉ. वैभव सबनीस यांनी तांत्रिक सहाय्य केले. उपक्रमात लावलेल्या प्रत्येक रोपाचे जिओ टॅगिंगद्वारे फोटो काढून त्याची नोंद करण्यात आली.
विद्यापीठाचा उपक्रम : तब्बल पाच तासात १२ हजार ९७७ रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 6:22 PM