जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबरच्या परीक्षा सध्या सुरू असून, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर (हॉलतिकीट) कॉपी केल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होवू शकते याची माहिती दिल्यामुळे या सत्रात कॉपी करण्याचे प्रमाण घटले आहे, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला.
कॉपी व तणावमुक्त परीक्षांसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, त्या दृष्टीने काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जात आहे. या प्रयत्नांचे चांगले परिणाम आता दृष्टिपथात येत आहेत. पदवी व पदव्युत्तरच्या परीक्षा केंद्रांना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वतंत्रपणे भेटी देवून परीक्षांचा आढावा घेतला.
तातडीने ऑनलाइन मूल्यांकन - विद्यापीठाने झालेल्या परीक्षांचे तातडीने ऑनलाईन मूल्यांकन सुरू केले असून, कुलगुरूंनी भेटी दिलेल्या महाविद्यालयात मूल्यांकन केंद्रालाही भेट देवून माहिती घेतली. सर्व प्राध्यापकांनी या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी केले आहे.
कुलगुरू देताहेत परीक्षा केंद्रांना भेटी - कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी बुधवारी जामनेर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी येथील गरूड महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयात सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे उपस्थित होते. गुरुवारी साक्री येथील सी. गो. पाटील महाविद्यालयाला देखील कुलगुरूंनी भेट दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी देखील जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.