जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणक शास्त्र विभागाचे संचालक प्रा.डॉ.सतीश रमेश कोल्हे यांना परिक्षा शुल्क भरण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यानेच ४ हजार रुपयाच चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याने प्रा.कोल्हे यांच्याशी उध्दटपणाने बोलून संपर्कच तोडला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच, विद्यार्थ्याचे पालक हादरले असून तक्रार मागे घ्यावी म्हणून गयावया करु लागले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजता प्रा.डॉ.सतीश रमेश कोल्हे विद्यापीठातून परत जात असताना बँकेच्या एटीएममधून त्यांनी काही रक्कम काढली. यावेळी तेथे दोन तरुण उभे होते. आपण बाहेरच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी असून परिक्षा शुल्क भरण्यासाठी कांउटरवर ऑनलाईन पैसे स्विकारले जात नाहीत, त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत असे सांगून प्रा.कोल्हे यांच्याकडे चार हजार रुपये मागितले. हे पैसे मी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर करतो म्हणून सांगितले. त्यासाठी प्रा.कोल्हे यांना या विद्यार्थ्याने मीस्ड कॉल करायला लावला. प्रा.कोल्हे यांनी चार हजार रुपये दिल्यानंतर मी तुम्हाला उद्या पैसे देतो असे सांगून ते विद्यार्थी निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रा.कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी पैसे मिळण्याची वाट बघितली, मात्र तेव्हाही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आणखी एक दिवस थांबून प्रा.कोल्हे यांनी त्या विद्यार्थ्याशी संपर्क करुन पैशाची मागणी केली असता त्याने त्यांना अरेरावीची भाषा वापरुन नंतर बोलतो असे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याच्याशी संपर्कच झाला नाही.
पालकांनी केला प्राध्यापकांना विनंती
पैसे तर गेलेच उलट वरुन अपमास्पद वागणूक मिळाल्याने प्रा.कोल्हे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची भेट घेवून झाल्याप्रकाराची माहिती दिली. बकाले यांनी सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याची कुंडली काढली व त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. ते रेल्वेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. मुलाला घेऊन येण्याचे बकाले यांनी सांगताच त्यांनी प्राध्यापकाची भेट घेऊन गयावया केली. काहीही करा आम्हाला पोलिसांकडे बोलावू नकाण मुलाच्यावतीने माफी मागतो व पैसेही परत करतो म्हणून त्यांनी प्राध्यापकाच्या विनवण्या केल्या. हे प्रकरण अजूनही पोलिसांकडे चौकशीवर आहे.