ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29 - पतीच्या निधनानंतर नेरीनाका स्मशानभूमीची डागडुजी, रंगरंगोटी व साफसफाई करण्याची ईच्छा व्यक्त करीत ती पूर्ण करणा:या सुमती श्यामसुंदर नवाल यांनी त्यांच्या स्वत:च्या मृत्यूपूर्वी देखील अशाच प्रकारे स्मशानभूमीची डागडुजी, रंगरंगोटी व सफाई करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. 18 मे रोजी त्यांचे निधन झाल्याने नवाल कुटुंबियांतर्फे त्यांची ही इच्छा पूर्ण करूनच त्यांना मुखागAी दिला.
अनेक समस्या असलेल्या नेरीनाका येथील वैकुंठधामचे नवाल परिवारातर्फे नूतनीकरण करण्यात आले आहे. परिवारातील ज्येष्ठ सदस्य, माजी नगरसेविका सुमती श्यामसुंदर नवाल यांनी पती श्यामसुंदर नवाल यांच्या मृत्यूच्यावेळी वैकुंठधाम परिसरातील तुटलेल्या बाकांची दुरुस्ती, संपूर्ण वैकुंठधामला रंगरंगोटी, साफसफाई, झाडांच्या बुंध्याला गेरूचे लेप आदी कामे करण्याची ईच्छा व्यक्त केली. फेब्रुवारी 2014 मध्ये त्याची पूर्तताही केली. सुमती नवाल यांनी स्वत:च्या मृत्यूपूर्वीही पुन्हा डागडुजी, रंगरंगोटी व साफसफाईचे काम व्हावे, अशी ईच्छा व्यक्त केली होती. 18 मे रोजी त्यांचे निधन झाल्याने नवाल कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार संपूर्ण वैकुंठधामची स्वच्छता करून रंगरंगोटी केली. तसेच तुटलेली बाके दुरुस्त केली. झाडांच्या बुंध्याला गेरूचा लेप लावण्यात आला. त्यानंतरच सायंकाळी 5 वाजता सुमती नवाल यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदर्श आणि प्रेरणा देणारे कार्य
मृत्यूनंतरही त्यांनी वैकुंठधामच्या ऋणातून स्वत:ला मुक्त करून घेतले, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. समाजाला आदर्श आणि प्रेरणा देणारे कार्य नवाल कुटुंबियांनी प्रत्यक्ष करून दाखविले.