लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाला १७ दिवसांचा अवधी लोटला आहे. यात गेल्या दहा दिवसांपासून सर्वच अनलॉक आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या शंभराच्या खालीच स्थिर असून, पॉझिटिव्हिटी ही दोन टक्क्यांच्या आतच असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गर्दी झाल्यानंतर साधारण दोन आठवड्यांनी याचे परिणाम समोर येऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, रुग्णसंख्या स्थिर असल्याने कोरोना विषाणूची तीव्रता, संसर्ग कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या चार ते पाच तालुक्यांमध्ये आता ५०च्या आत आली आहे. रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड उपलब्ध असून, कोरोनाचा कहर थांबल्याचे एक दिलासादायक चित्र या १७ दिवसात टप्प्याटप्प्याने समोर आले आहे. दरम्यान, पॉझिटिव्हिटीमध्ये किंचितशी वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र, ती अद्याप २ टक्क्यांच्या खालीच असल्याने तो एक दिलासा आहे. पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर निर्बंधांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने या आधीच जाहीर केले आहे.
गाफीलपणा ठरू शकतो घातक
पहिली लाट ओसरल्यानंतरच्या अनलॉकमधील कोरोना गेल्याचा गाफीलपणा व नियमांमध्ये आलेली शिथिलता या बाबींमुळे कोरोनाचा उद्रेक दुसऱ्या लाटेत समोर आला. मात्र, आता दुसऱ्या लाटेनंतर जरी कोरोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी वैयक्तीक पातळीवर तीन नियम पाळले न गेल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे, या बाबी पाळाव्याच लागणार आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.
लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट
गेल्या १६ दिवसांचा विचार केल्यास यात बरे होणारे अधिक व नवीन रुग्ण कमी असेच चित्र कायम राहिले आहे. या १६ दिवसात ५०५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्या तुलनेत नवीन रुग्ण कमी असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटून आता १,६५१ वर आली आहे. दरम्यान, यात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही ४४६ असून, गेल्या १६ दिवसात लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ४७०ने घट झाली आहे. त्यामुळे यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
आठवडानिहाय स्थिती
१ ते ८ जून ९६२ नवे रुग्ण आढळले
९ ते १६ जून ६१८ रुग्ण आढळले
१ ते ८ जून मृत्यू २२
९ ते १६ जून मृत्यू ८
चाचण्या
१ ते ८ जून ५२ हजार ३६२
१ ते १६ जून ३२ हजार ५८६
१ ते ८ जून पॉझिटिव्हिटी १.८३ टक्के
९ ते १५ जून पॉझिटिव्हिटी १.८९ टक्के
१ जून दैनंदिन पॉझिटिव्ह १५७
एकूण रुग्ण १,४०,१४२
एकूण बरे झालेले १,३२,४४९
एकूण मृत्यू २,५३५
८ जून दैनिंदिन पॉझिटिव्ह १०९
एकूण रुग्ण १,४१,१०३
बरे झालेले १,३५,९२९
मृत्यू २,५५७
१६ जून दैनंदिन पॉझिटिव्ह ६३
एकूण रुग्ण १,४१,७२१
बरे झालेले १,३७,५०५
मृत्यू २,५६५
रविवारपासून स्थिती
१३ जून ७२, मृत्यू ०१
१४ जून ७६, मृत्यू ०१
१५ जून ६४, मृत्यू ०१
१६ जून ६३, मृत्यू ०१