लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दोन महिन्यांनंतर जळगावची परिस्थिती बघता सर्व अनलॉक करण्यात आले आहे. सर्व पूवर्वत सुरू झाले असले तरी कोरोना हा संपलेला नाही. त्यामुळे हा धोका ओळखूनच प्रत्येकाने आपले वर्तन ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचे पॅटर्न बघता तिसरी लाट नाकारता येत नाही, त्यामुळे आपण सावधच असायला हवे, असेही डॉक्टर सांगतात.
जिल्ह्याच्या पहिल्या लाटेचा पॅटर्न बघता मार्च महिन्यांत पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र, जेव्हा जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढली तेव्हा हळूहळू रुग्ण समोर येऊ लागले आणि जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये कोरोनाचा कहर समोर आला.
सप्टेंबरनंतर काहीसा दिलासा होता. टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाले. तेव्हाही अचानक रुग्णवाढ समोर आली नव्हती. ऑक्टोबरपासून कमी झालेली रुग्णसंख्या १५ फेब्रुवारीपासून वाढायला लागली. त्यामुळे हा पॅटर्न बघता सुरुवातीला जो विषाणू होता तोच कायम राहिला असता तर कदाचित भयावह परिस्थिती झाली नसती. मात्र, या विषाणूत म्यूटेशन झाल्यामुळे तो अधिक घातक झाला व अत्यंत वेगाने त्याचा संसर्ग झाला. नवा स्ट्रेन आला, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवितात. त्यादृष्टीने तपासणीसाठी काही नमुनेही पुणे, दिल्ली येथे पाठविण्यात आले. मात्र, त्यांचा अहवाल समोर आला नाही. मार्च- एप्रिलमध्ये ही दुसरी लाट अत्यंत भयावह ठरली. हे म्यूटेशन अधिक घातक असते, असे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी स्पष्ट केले होते. विषाणूमधील जनुकीय बदल असे त्यावेळी संबोधण्यात आले होते.
...तर मग ती तिसरी लाट
येत्या काही दिवसांत पॉझिटिव्हिटी वाढल्यास सध्या जे दोन टक्के रुग्ण आहेत. त्यांच्यामुळे हा स्प्रेड झाल्याचे म्हणता येईल. मात्र, हीच वाढ जर दोन किंवा तीन महिन्यांनी समोर आली तर ती तिसरी लाट असेल किंवा नवीन पॅटर्न, नवीन स्ट्रेन असेल, अशी शक्यता आहे. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतरचे पुढील दोन आठवडे यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. नागरिकांनी नियम न पाळल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असेही डॉक्टर सांगतात.
प्रशासनाचा इशारा
सद्य:स्थितीत जिल्ह्याची पाॅझिटिव्हिटी अर्थात रोज समोर येणाऱ्या अहवालांमध्ये आढळून येणारे बाधित हे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, आगामी काळात हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास अनलॉकच्या नियमांमध्ये बदल करण्यात येतील, असा इशारा आधीच प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे याबाबतीत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. सद्य:स्थितीत शहराची पॉझिटिव्हिटी ही दोन टक्क्यांपर्यंत आहेच. अनलॉक झाले असले तरी नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.
कोरोना संपलेला नाही. अद्यापही दोन टक्के बाधितांचे प्रमाण आहेच. शिवाय गर्दीचे ठिकाण, कोण कुठून आला आहे, त्याला कोविड आहे की नाही, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे या बाबींचा विचार करूनच वैयक्तिक पातळीवर सुरक्षा पाळल्यासच कोरोनाला अटकाव घालता येऊ शकतो.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा