जळगावात भाजपच्या विजयरथाला बंडाळीची ‘मोगरी’
By विलास बारी | Published: April 2, 2024 09:29 PM2024-04-02T21:29:52+5:302024-04-02T21:30:05+5:30
उन्मेष पाटलांची भूमिका ठरणार भाजपसाठी डोकेदुखी
जळगाव :जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यामुळे नाराज झालेले उन्मेष पाटील व भाजपचे एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख करण पवार यांना आपल्या गोटात सहभागी करून घेण्याची खेळी करीत, उद्धवसेनेने भाजपसमोरील डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळे भाजपला आता जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रारंभी वाटली होती तेवढी सोपी राहिलेली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजप एकतर्फी विजय खेचून आणत आहे. यावेळी भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. ती नेमकी हेरत उद्धवसेनेने या मतदारसंघात सक्षम पर्यायाचा शोध सुरु केला होता. तो शोध उन्मेष पाटील व करण पवार यांच्यापर्यंत येऊन थांबला असल्याचे दिसत आहे.
बदलणार समीकरण
खासदार उन्मेष पाटील, करण पवार यांनी मंगळवारी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. उभय नेते बुधवारी `मातोश्री’वर शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा आहेत. नव्याने तयार होणाऱ्या या समीकरणामुळे लढतीचे चित्र बदलू शकते. उद्धवसेनेने स्वत: उन्मेष पाटील किंवा त्यांच्या अर्धांगिनी संपदा पाटील अथवा करण पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपसाठी लढत प्रारंभी भासत होती तेवढी सोपी राहणार नाही, असा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे.
शिवसेनेतील बंडानंतर जळगावातील उद्धवसेनेतील नेते शिंदेसेनेत गेले असले तरी, कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात उद्धवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील व करण पवार यांच्या पक्षप्रवेशानंतर चाळीसगाव, पारोळा व एरंडोल या तीन तालुक्यांमध्ये उद्धवसेना मजबूत होणार आहे. शिवाय पाचोरा, भडगाव, तसेच जळगाव शहर व तालुक्यात उद्धवसेनेचे संघटन अजूनही चांगले आहे.
गिरीश महाजन, मंगेश चव्हाण यांची डोकेदुखी वाढणार !
मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याची आणि त्यामुळे नाराजी वाढल्याची भाजपमधील अनेकांची भावना आहे. पाटील व पवार यांचा समर्थकांसह उद्धवसेनेत प्रवेश झाल्यास भाजपच्या या दोन नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरु आहे. त्यामुळे भाजपमधील खडसे समर्थक सक्रिय झाल्याची डोकेदुखी वेगळीच असेल.