जळगाव आगार : फलाटावर बस न लागता इतरत्र बस लागत असल्याने प्रवाशांचा उडतोय गोंधळ
सचिन देव
जळगाव : बाहेरगावी जाण्यासाठी स्थानकात आल्यावर बहुतांश प्रवाशी हे बस थांबत असलेल्या फलाटासमोर उभे राहत असतात. मात्र, जळगाव आगारातील बहुतांश चालक हे फलाटासमोर बस उभी न करता, आगारात इतरत्र ठिकाणी बसेस उभ्या करत असल्यामुळे प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडत आहे. नियोजित फलाटावर लागणारी बस इतर ठिकाणी लागल्यामुळे प्रवाशांना धावपळ करून बस पकडावी लागत आहे. जळगाव आगारात गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे आगार प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जळगाव आगारात पहाटे पासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. प्रवाशांची बस पकडताना गैरसोय होऊ नये, म्हणून महामंडळातर्फे जळगाव आगारात ठिकठिकाणी फलाट उभारण्यात आले असून, फलाटासमोर गावांची नावेही लिहिली आहेत. ज्यामुळे प्रवाशांना बस तत्काळ बस पकडणे सोयीचे आहे. मात्र, आगारातील बहुतांश चालक हे, फलाटावर बसेस उभी न करता आगारात इतरत्र कुठेही बसेस उभी करत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसवरील चालकही कुठेही बस उभी करत आहेत. ज्या वेळी संबंधित गावाची बस लागल्याची उद्घोषणा होते. त्यावेळी मात्र प्रवाशांना बस शोधण्यापासून ते पकडण्यापर्यंत चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे महिला व वयोवृद्ध प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, बसच्या दरवाजाजवळ एकच गोंधळ उडत आहे. या प्रकारामुळे अनेकदा वादाच्यादेखील घटना घडल्या आहेत. असे असतानाही आगारामध्ये अद्यापही फलाटावर बसेस लागत नसून, बोटावर मोजण्याइतकेच चालक नियमाप्रमाणे फलाटावर बस लावत आहेत.
इन्फो :
प्रवाशांची प्रतिक्रिया
आगारात कधीतरी धुळे, नाशिक, पुण्याकडे जाणाऱ्या बसेस फलाटावर लागलेल्या दिसतात. इतर गावांना जाणाऱ्या बसेस मात्र कुठेही रस्त्यात लागलेल्या दिसतात. जर फलाटावर बस लागत नसेल तर या फलाटाचा उपयोग काय, चालकांकडून इतरत्र बस लावण्यात येत असल्यामुळे नागरिकांचे बस पकडण्यासाठी खूप हाल होतात. याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
-सुनील लोखंडे, प्रवासी
आगारात नियमानुसार फलाटावर बसेस लागल्या तर नागरिकांची बस पकडण्यासाठी जी धावपळ होते, ती होणार नाही. कधीतरी बस संबंधित गावांच्या फलाटासमोर लागलेली दिसते. चाळीसगाव, पाचोराकडे जाणाऱ्या बसेस तर आगारात प्रवेश करताना रस्त्यावर लागलेल्या दिसतात. त्यामुळे प्रवाशांना आगारातही बस शोधावी लागते.
- संदीप साने, प्रवासी
इन्फो :
आगारामध्ये फलाटांवर इतर गावांच्या बसेस उभ्या असल्यामुळे, जळगाव आगारातील असो किंवा इतर आगारातील चालकांना बस लावायला जागा राहत नाही. त्यामुळे नाइलाजाने चालकांना फलाट सोडून, इतरत्र बस लावावी लागते. प्रवाशांच्या सुविधेसाठी बस लागल्याची घोषणाही करत असतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी चालकांना पुन्हा फलाटामध्ये बस लावण्याबाबत सूचना देण्यात येतील.
- नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार