लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात घट झाल्याने थंडीची लाट पसरली होती. मात्र, दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत असून, किमान तापमानात दोन दिवसात ६ अंशाची वाढ झाली आहे. तर कमाल तापमानात देखील वाढ होत आहे. त्यातच एकीकडे रब्बी हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यात रब्बीचा हंगाम ऐन काढणीवर असतानाच जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच यंदा देखील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम देखील पूर्णपणे वाया गेला होता. त्यातच आता पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत.
अवकाळीचे कारण काय ?
बंगालच्या उपसागरात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, बाष्पयुक्त हवा घेऊन हे क्षेत्र मध्य भारतकडे प्रवेश करताना दिसून येत आहे. त्यातच एक कमी दाबाचा पट्टा केरळ ते मराठवाडापर्यंत तयार झाला आहे. काही दिवसात दोन्ही हवा एकमेकांना आदळून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवांमुळे १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाचा अंदाज ६४ टक्के इतका आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.
हिवाळ्यातील तिन्ही महिन्यात झाला पाऊस
हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण अफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचे आगमन झाले आहे. यंदाच्या हिवाळ्यात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी सांगितले.
तर रब्बीचे होऊ शकते नुकसान
वातावरणात मोठ्या प्रमाणात बदलामुळे आधीच रब्बी हंगाम आता लांबला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारी रब्बीची लागवड आता डिसेंबरअखेरपर्यंत होत असते. यामुळे रब्बीचा हंगाम मार्चमध्ये न संपता एप्रिलमध्ये संपत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात अवकाळीचे संकट असून, त्यातच मार्च महिन्यात देखील अवकाळीसह वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रब्बीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.