जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. पदाधिकारी नियुक्ती करताना आमदार चंद्रकांत पाटील यांना झुकते माप देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीही चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हाप्रमुख हे पद होतेच आता पुन्हा ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना आक्रमक अनेक बैठका गाजविणाऱ्या पाटील यांच्याकडे आता आमदारकी आणि जिल्हाप्रमुखपदही एकाचवेळी सोपविण्यात आले आहे. आमदार आणि जिल्हाप्रमुख ही पदे सांभळणारे ते एकमेव असावेत.
या नियुक्तीमागे शिवसेना नेत्यांच्या त्यांच्याकडून निश्चितच मोठ्या अपेक्षा असतील. मुक्ताईनगरातील भाजपचे १३ पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत घेऊन त्यांनी आपल्या कामाचा शुभारंभ केला. जिल्हाप्रमुखपद ही त्याचीच पावती असावी.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांना अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा मिळाला. आधीच आक्रमक आणि संघर्षशील नेते असलेले पाटील हे आता या दोन्ही जबाबदाऱ्या ते कशा पेलतात, याकडेही नेत्यांचे लक्ष असेल. भाजप- शिवसेना युती तुटल्याचा राग अजूनही शिवसेनेच्या मनात आहे. त्याद्दष्टीने भाजपला संधी मिळेल तिथे खिंडीत गाठायचे असा प्रयोग सध्या सुरु आहे. त्याची सुरुवात जळगाव व मुक्ताईनगरमधून झाली असेच म्हणावे लागेल.
आमदार पाटील यांच्याकडे मुक्ताईनगरसोबत रावेर मतदार संघाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे दोन्ही तालुके त्यांच्याच मतदार संघात येतात. त्यामुळे एकाचवेळी संघटना आणि विकास अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांना पेलाव्या लागणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद सदस्य असताना ते आक्रमकपणे बाजू मांडायचे आणि यंत्रणेला हलवून टाकायचे. आता इथेची त्यांचा कसोटी लागणार आहे. पाटील यांच्याकडे त्यांच्याकडे रावेर , मुक्ताईनगर व जामनेर हे तीन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहे. तर त्यांच्याच जवळचे समजले जाणारे भुसावळ येथील तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनाही जिल्हा प्रमुखपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे भुसावळ व चोपडा विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे.
मात्र मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दुसरीकडे चोपडयाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे या विभागाचा सहसंपर्क प्रमुख पद सोपविण्यात आले आहे. त्यांच्याही अनुभवाचा फायदा शिवसेनेला होणार आहे. एकाचवेळी चार ते पाच तालुक्यांची जबाबदारी तीन
नेत्यांकडे सोपवून शिवसेनेने आणखी एक नवी खेळली आहे.