जळगाव : ठेवीची मुदत पूर्ण होऊनही गेल्या १२ वर्षांपासून ठेवीदारांना त्यांची रक्कम परत दिली जात नसल्याने भुसावळ येथील काळा हनुमान पतसंस्थेचे चेअरमन अभय नारायण राजे यांना अडीच वर्षे तर सहा संचालकांना दोन वर्षांचा कारावास सुनावताच संचालक मंडळाने ग्राहक न्यायालयाकडे २२ लाख भरले. रक्कम देण्यात आल्याने न्यायालयाचा आदेश रद्द झाला.या बाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील काळा हनुमान पतसंस्थेत छाया नारायण पाटील, पंकज नारायण पाटील, प्रतिभा नारायण पाटील यांच्या २००४पासून ठेवी ठेवलेल्या होत्या. या ठेवींची २००७मध्ये मुदत पूर्ण झाली, मात्र या ठेवीदारांना सोसायटी व संचालक मंडळाने रक्कम परत केली नाही. त्यामुळे ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात २० तक्रारी अर्ज दाखल केले. २००८मध्ये तक्रारदारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. तरीदेखील ठेवीदारांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी २०१०मध्ये निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केले. त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन ६ डिसेंबर रोजी ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षा व्ही.व्ही. दाणी, सदस्या पूनम मलिक, सदस्य सुरेश जाधव या पॅनलने निर्णय दिला. त्यात पतसंस्थेचे चेअरमन अभय नारायण राजे यांना अडीच वर्षाचा कारावास व दहा हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच इतर सहा संचालकांना दोन वर्षे कारावासी शिक्षा सुनावली. एकूण अठरा प्रकरणातील ही शिक्षा वेगवेगळी भोगायची असल्याचे आदेशात म्हटले. तसेच या वेळी तीन संचालक हजर नसल्याने त्यांच्याविरुद्ध वारंट काढण्यात आले. संचालक मंडळाने रक्कम दिल्यास हे आदेश रद्द ठरणार असल्याचेही नमूद केले.निकाल लागताच अर्धा तासात भरले २२ लाखपतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळास शिक्षा सुनावताच संचालक मंडळाने अर्धा तासात २२ लाख रुपयांचा भरणा केला. त्या वेळी ही रक्कम छाया नारायण पाटील या वृद्ध महिलेला देण्यात आली. रक्कम भरल्याने शिक्षेचे आदेश रद्द ठरविण्यात आले.तक्रारदारांतर्फे अॅड. हेमंत भंगाळे यांनी काम पाहिले.
शिक्षा सुनावताच काळा हनुमान पतसंस्थेच्या संचालकांनी भरले २२ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:15 PM