लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, मनपा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊनदेखील आपल्या हक्काच्या रकमेसाठी महापालिकेकडे चकरा माराव्या लागत असतात. मात्र सोमवारी सेवानिवृत्त झालेल्या मनपाच्या ३५ कर्मचाऱ्यांना मनपा प्रशासनाने सुखद धक्का देत सेवानिवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा केली आहे.
सोमवारी महापालिकेचे ३५ कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त मनपा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ३५ कर्मचाऱ्यांना १ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पाच ते सात लाखांची रक्कम मिळाली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोमवारी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ५ लिपिक, १ मुकादम, ६ वाहन चालक, १ जकात निरीक्षक, १ नाकेदार, मजूर, शिपाई, गवंडी, वाॅचमन मिळून १८ असे एकूण ३५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.