लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जळगाव महापालिकेच्या ४९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपयांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या सुधारित अहवालास शासनाने मंजुरी दिली आहे. तसा आदेश १४ मे रोजी शासनाच्या नगर विकास विभागाने काढला आहे.
जळगाव मनपाने प्रकल्पासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी राज्य अभियान संचालनालयाच्या स्तरावर करून तो प्रस्ताव २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या उच्चाधिकारी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. नंतर समितीने प्रस्तावाला मान्यता दिली होती. मनपाने सादर केलेल्या प्रस्तावापैकी ३० कोटी ७५ लाख १६ हजार रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर आता पुन्हा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ४९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपयांच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ स्वरूपात मंजूर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या किमतीत सुधारित सविस्तर प्रकल्प अहवालामुळे वाढ होत असल्यास वाढीव खर्च संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून अथवा स्वनिधीमधून मागविण्यात यावा, यासाठी शासनाकडून कुठलाही वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही, असे शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशात म्हटले आहे.