जळगाव : रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी असतानाही शिवाय प्रकृती गंभीर असतानाही कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करण्याचा आग्रह करून हुज्ज्त घातल्या प्रकरणी बीबा नगरातील दाम्पत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबानगरातील एका वृद्धाची ऑक्सिजन पातळी कमी असताना त्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातच दाखल करावे असा आग्रह त्यांची मुलगी व जावयांनी केला हाेता. बाबांची ऑक्सिजन पातळी ठिक असून तुमचे मशिन खराब असल्याचे त्या डॉक्टरांना सांगत होत्या. डॉक्टरांनी यावेळी समजावण्याचा प्रयत्न केला व कोविड केअर सेंटरला केवळ लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवण्यात येते गंभीर रुग्णांना या ठिकाणी दाखल केले जात नाही, असे डॉक्टरांनी सांगितले, मात्र, या ठिकाणी रूग्णाची मुलगी व जावयाने हुज्जत घातली, पोलिसांनीही समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, ते जुमानले नाही. अखेर गुन्हा दाखल केल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले. लक्षणानुसार रुग्णांना कुठे ठेवायचे या मार्गदर्शक सूचनानुसार डॉक्टरांनी निर्णय घ्यायचा असतो, हा वाद होईपर्यंत रूग्णाला महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून सिव्हीलला पाठविल्याचे डॉ. घोलप यांनी सांगितले.