ऑनलाइन लोकमत /पंढरीनाथ गवळी
जळगाव, दि. 4 - सध्या बोलबाला असलेल्या डिजिटल पद्धतीचा अंमल रेल्वेत सुरू झाला आहे. बदलाच्या या प्रवाहात मध्य रेल्वेने ‘स्वयंचलित सिग्नल प्रणाली’वर भर दिला आहे. मुंबईतील लोकल गाड्या याच सिग्नल प्रणालीवर चालतात. मुंबईनंतर जळगाव-भुसावळमधील 25 किमी अंतरासाठी ‘स्वयंचलित सिग्नल प्रणाली’ (अॅटोमॅटिक-ब्लॉक सेक्शन) चा वापर केला जात आहे. भुसावळपासून इगतपुरी, बडनेरा, खंडवा आणि यवतमाळ, अचलपूर, अमरावती असा एक हजार कि.मी. परिसरात भुसावळ रेल्वे विभागाची व्याप्ती आहे.
स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे अनेक प्रवासी व मालगाड्या चालविल्या जाऊ शकतात. त्यामुळे भुसावळ-जळगाव दरम्यान, या प्रणालीमुळे जास्त गाड्या चालविल्या जात आहेत. या प्रणालीमुळे एकापाठोेपाठ सात गाड्या धावू शकतात. हे या प्रणालीचे वैशिष्ट्य. भुसावळ रेल्वे स्थानकावरुन प्रवासी वा मालगाडी पहिल्या सिग्नलवरुन (स्टार्टअप) सुरू झाल्यानंतर पुढे येणाऱ्या सिग्नलपासून स्वयंचलित सिग्नलद्वारे गाडी धावत असते. पूर्वी ही सिग्नल प्रणाली नसताना केवळ दोनच गाड्या चालविण्यात येत होत्या.
रेल्वे मार्गावर कोणतीही गाडी नसताना सर्व सिग्नल ‘लाल’ होतात. त्यानंतर गाडी पास होत असताना तो लाल असतो आणि पुढे दुसरा सिग्नल हिरवा झालेला असतो. गाडीने पुढचा सिग्नल ओलांडताच मागचा सिग्नल लाल होतो आणि त्याच्या आधीचा सिग्नल पिवळ होतो. याचा अर्थ गाडी चालकाने गाडी सावधपणे चालवावी. पुढचा सिग्नल हिरवा आहे. त्यावर थांबण्यासाठी सज्ज राहा, असा हा संकेत असतो.
यानंतर जशी गाडी पुढे जाते तसा तो सिग्नल लाल होतो. यानंतर मागचे दोन्ही सिग्नल एक-एक करुन पिवळे होत असतात. दोन सिग्नल पिवळे होतात, म्हणजे प्रतिबंधित वेगाने गाडी चालवावी, अशी सूचना त्यातून इंजिन चालकाला मिळालेली असते. चवथा सिग्नल गाडीने पार करताच तोही लाल होतो. मागचा एक पिवळा, दुसरा पिवळा व एक हिरवा होतो. या प्रमाणे ही स्वयंचलित सिग्नल प्रणाली काम करीत असते.
भुसावळ-जळगाव दरम्यान,एकापाठोपाठ गाडी धावताना.
मध्य रेल्वेत अशा आहेत सिग्नल पद्धती
४ रेल्वेत तीन सिग्नल प्रणाली वापरली जाते. पहिली पूर्ण ब्लॉक पद्धतीची सिग्नल यंत्रणा. दुसरी स्वयंचलित (अॅटोमॅटिक पद्धती) व तिसरी पद्धत एक गाडी पद्धती सिग्नल यंत्रणा. याच्या साहाय्याने रेल्वे गाड्यांचे परिचालन केले जाते.
स्वंयचलित सिग्नल प्रणालीमुळे गाड्यांच्या संख्येत वाढ
४ भुसावळ-जळगाव दरम्यान, स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित आहे. त्यामुळे या २५ कि.मी.च्या मार्गावर एकापाठोपाठ सात प्रवासी गाड्या व मालगाड्या चालविल्या जात आहेत. पूर्ण ब्लॉक व एक गाडी पद्धतीच्या सिग्नल प्रणालीमुळे केवळ दोनच गाड्या जाऊ व येऊ शकत होत्या.
भुसावळ-जळगाव दरम्यान २८ स्वयंचलित सिग्नल
४ भुसावळ-जळगाव या २५ कि.मी.अंतरासाठी २८ स्वयंचलित सिग्नल ठेवण्यात आले आहेत.यात भुसावळ-भादली सात. भादली-जळगाव-सात आणि परत जळगाव-भादली-सात व भादली-भुसावळ-सात असे २८ स्वयंचलित सिग्नल आहेत.
स्वयंचलित प्रमाणालीचा चांगला फायदा
अॅटोमॅटिक-स्वयंचलित सिग्नल प्रणाली मुंबई उपनगरीय लोकल सेवेनंतर मध्य रेल्वेच्या केवळ भुसावळ-जळगाव या मार्गासाठी कार्यान्वित आहे.या प्रणालीचा फारच चांगला फायदा आहे. यामुळे रेल्वे अधिक गाड्या चालविता येतात. त्यातून रेल्वे व प्रवाशांचे हित जपले जाते. - सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.