लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. यासह बिबट, मोर व विविध सरीसृपची नोंद देखील या भागात झाली आहे. या भागात एकीकडे वन्यजीवांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न वनविभाग व विद्यापीठाकडून होत असताना दुसरीकडे वन्यजीवांची शिकार करण्यासाठी शिकारी देखील या भागात सक्रिय झाले आहेत. विद्यापीठ परिसरात प्राण्यांची शिकार करण्यासाठी पिठामध्ये बॉम्बगोळे ठेवून शिकार केली जात असून, यामुळे गेल्या आठ दिवसांत चार कुत्र्यांचा व २ रान डुकरांचा मृत्यू झाला आहे.
विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या टेकड्यांवर, मोर, सरीसृप आणि वन्यजीवांचे वास्तव्य आहे. मागील काही दिवसांपूर्वी बिबट देखील आढळून येतात. यापूर्वी फास लावून आणि गिलोरीने शिकार करण्याच्या घटना नियमित घडत होत्या. विद्यापीठातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र अरुण सपकाळे, राजू सोनवणे आणि कर्मचारी यांनी नियमित गस्त घालून या घटनांवर आळा घालण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. फासे लावून शिकार करता येत नाही, म्हणून आता थेट बॉम्बगोळे पेरून शिकार करण्यापर्यंत शिकाऱ्यांची मजल गेली असल्याचे दिसून आले.
गेल्या ८ दिवसांत ४ कुत्र्यांचा मृत्यू
या परिसरात शेतीशिवार देखील असल्याने रानडुक्कर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या आणि इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या उद्देशाने ठिकठिकाणी बॉम्बगोळे पेरून ठेवले होते. त्या गोळ्यांना मांस देखील लावल्याचे दिसून येते. गेल्या आठ दिवसांत याठिकाणी ब्लास्टमुळे ४ कुत्री व २ रानडुकरांचा मृत्यू झाला आहे.
विद्यापीठ कर्मचारी वाचला, कुत्रा मात्र दगावला
विद्यापीठ कर्मचारी मनोज भालेराव हे त्या परिसरात आपला पाळीव कुत्रा घेऊन भटकंतीसाठी गेले होते. त्या दरम्यान कुत्र्याने बॉम्ब गोळा तोंडात घेतला आणि गिरनारे यांच्या हातात त्याचा पट्टा होता. गोळा खाऊ लागताच त्याचा स्फोट झाला आणि क्षणात कुत्र्याच्या जबड्याच्या चिंधड्या झाल्या. भालेराव यांच्या अंगावर देखील त्याचे अवशेष उडाले. जर पट्टा लहान असता तर भालेराव देखील गंभीर जखमी झाले असते. ही घटना वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरुण सपकाळे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांना माहिती कळवली.
वनपालांना चौकशीचे आदेश
जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आल्यानंतर, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांना पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वनविभागाचे ज्ञानेश्वर देसाई, वनपाल आर. एस. ठाकरे व पद्मालय राऊंड स्टाफ, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अरुण सपकाळे, अमन गुजर, प्रोफेसर किशोर पवार, सुभाष पवार, विठ्ठल धनगर, मनोज भालेराव, अरविंद गिरनारे, राजू सोनवणे, अमोल देशमुख, सुरेंद्र नारखेडे यांनी परिसरात शोध घेतला असता एक बॉम्बगोळा आढळून आला, त्याला झाकून ठेवण्यात आले होते. या परिसरात अजून बॉम्बगोळे पेरून ठेवल्याची शक्यता आहे. आम्ही वनविभागाच्या निगराणीत ते शोधणार आहोत, असे अरुण सपकाळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोट..
मागील वर्षी हनुमान खोऱ्यात वनविभागाच्या परवानगीने लोकसहभागातून २५ लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे बंधारे विकसीत केले आहेत. त्या मुळे वन्यजीवांचा पाण्याच्या प्रश्न सुटल्याने त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वी मोर, ससे, लहान मोठे पक्षी यांच्या किरकोळ
घटना घडल्या आहेत त्यावर बऱ्यापैकी अंकुश आला होता. परंतु आता थेट बॉम्ब गोळे पेरण्या पर्यंत शिकऱ्यांची मजल गेली असल्याने तात्काळ दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. - बाळकृष्ण देवरे ,वन्यजीव संरक्षण संस्था,
विद्यापीठ व हनुमान खोऱ्यात शिकार करणे कठीण झाल्याने, शिकाऱ्यांची अडचण वाढली आहे. त्यामुळे शिकाऱ्यांनी आपला मोर्चा खासगी जागेवर वळविला आहे. कोणाच्याही शेतात व खासगी प्लॉटमध्ये हे बॉम्बगोळे ठेवले जात आहेत. यामुळे वन्यजीवांप्रमाणेच नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पुर्णपणे अमानवीय कृत्य असून, याबाबत पोलीसांनीही लक्ष घालण्याची गरज आहे.
- अरुण सपकाळे, वन्यजीव संरक्षण संस्था,