कंत्राटदाराची करामत : फसवणुकीचा गुन्हा दाखल
जळगाव : वाळू लिलावाची रक्कम परत मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनाची बनावट सही करून व शिक्का मारून तो गौण खनिज विभागात सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंत्राटदार नईम शेख अकबर (रा. डी.४०, एमआयडीसी, जळगाव) यांच्याविरुद्ध बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार बालाजी कुपन ऑनलाइन लाॅटरीचा मालक नईम शेख अकबर याने आव्हाणी, ता. धरणगाव येथील वाळूचा ठेका घेतला होता. लिलावासाठी काही रक्कम गौण खनिज विभागात भरली होती. वाळू उपशास ग्रामस्थांकडून होत असलेल्या त्रासामुळे लिलाव रद्द करून शासनाकडे भरलेली रक्कम परत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन शाखेत अर्ज केला होता. या शाखेतील अव्वल कारकून राजेंद्र सुदाम पाटील हे १५ मार्च ते ५ एप्रिल २०२१ या कालावधीत रजेवर होते. त्यामुळे नईम शेख याने पाटील यांची बनावट सही करून त्यांच्या कार्यालयाचा बनावट शिक्का मारून हा अर्ज गौण खनिज विभागात सादर केला. हा प्रकार या कार्यालयातील लिपिक गवई यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी राजेंद्र पाटील यांच्याकडे विचारणा केली. ही सही व शिक्का बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रारंभी तक्रार अर्जाची चौकशी झाली, त्यातही तथ्य निघाल्याने राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून नईम शेख अकबर याच्याविरुद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयिताला अद्याप अटक झालेली नाही.