उपमहापौरांचे आयुक्तांना पत्र :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव-महापालिकेला चौदाव्या वित्त आयोगातंर्गत प्राप्त निधीतील ४० कोटींचा निधी शिल्लक आहे. हा निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंतची मुदत असून, मार्चपर्यंत पैसा खर्च न झाल्यास हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. मनपाने अद्यापही या निधीचे नियोजन केलेले नाही. मनपाने लवकरच या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक यंत्र सामुग्री खरेदी करण्यात यावी, अशा सूचना देत उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे.
उपमहापौरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेकडे दर तीन वर्षासाठी १४ व्या वित्त आयोगातंर्गत ११६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो. त्यापैकी ४० कोटी रुपयांचा शिल्लक आहे. हा निधी खर्च करण्यासाठी मार्च महिन्याची मुदत आहे. आधीच या निधीला मुदतवाढ न मिळाल्यास हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. मनपाकडील कामाचा ताण व अपूर्ण यंत्र सामुग्रीमुळे अनेकदा नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास अडचणी येत असतात. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती फारशी चांगली नाही. शहरासाठी नवीन जेसीबी यंत्र, व्हॅक्युम एम्प्टीयर या साधनांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. नाला एस्केव्हेटरचीही कमतरता आहे. ही साधने चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक ४० कोटींच्या निधीतून खरेदी करता येणार आहेत. शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर विंड्रो कंपोस्टिंग प्रक्रिया करण्यासाठी जेसीबीची आवश्यकता भासणार आहे. कामाचा वाढता ताण लक्षात घेता जेसीबी सतत बंद पडत असतात. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी साेडविण्यासाठी या यंत्रांची शिल्लक निधीतून खरेदी करावी अशी मागणी उपमहापौर सुनील खडके यांनी केली आहे.