लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्राथमिक शिक्षण विभागाकडून विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसाठी यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, ही सेवाज्येष्ठता यादी सन २०१४ सालाची आहे. वास्तविक आता २०२१ वर्ष सुरू आहे. तब्बल सात वर्ष जुनी यादी पदोन्नतीसाठी वापर केली जात आहे. त्यामुळे ही यादी तत्काळ अपडेट करण्यात यावी, अशी मागणी पदवीधर शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. विजय बागुल यांनी केली आहे.
पदोन्नतीसाठीची प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीची शिक्षकांनी पाहणी केली. अनेक त्रुटी त्यामध्ये आढळून आल्या आहेत. यादीतील सुमारे ७० ते ८० शिक्षक सेवानिवृत्त झालेली आहे, तर यादीतील ४० ते ५० शिक्षकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. अनेक शिक्षकांची बदली होऊन सहा ते सात वर्षे उलटली. त्यांची नावे व शाळा जुन्याच दाखविण्यात आल्या आहेत. बहुतांश शिक्षकांची नावे सुद्धा चुकलेली आहेत. यादीत सरसकट सर्व शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कुठली यादी विस्तार अधिकारी पदासाठी आहे व कुठली यादी केंद्रप्रमुख पदासाठी आहे याचा उलगडा होत नाही, त्यामुळे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदासाठी स्वतंत्रपणे यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.