सुनील पाटील
सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच !
सध्याच्या युगात सर्वच क्षेत्रात अतुलनीय बदल झाले आहेत. सोशल मीडिया हे एक मोठे प्रभावशाली माध्यम पुढे आलेले आहे. या सोशल मीडियामुळे खूप फायदे होत असले तरी तोटेही तितकेच होत आहेत. पूर्वीचा पोस्टमनमार्फत होणारा पत्रव्यवहार बंद झाला. गावा-गावांत दररोज दिसणारा पोस्टमन आता पोस्ट ऑफिसमध्येसुद्धा क्वचितच दिसतो. कारण त्याला आता काही कामच नाही. लहानपणीचं ‘आई माझं पत्र कधीच हरवलेय’. अर्थातच या पत्राची जागा आता मोबाईलने घेतलीय.
मोबाईल फोनवरून महिनोंमहिने चालणारा पत्रांचा प्रवास काही सेकंदात होऊ लागला. लोकांचा भरपूर वेळ वाचू लागला आणि नजीकच्या काळात सोशल मीडियाने थैमान घातले. या थैमानाचा परिणाम असा झाला की, आजची तरुणाई सोशल मीडियाच्या व्यसनाधीन झाली आहे. आज एवढी जाणिवता नसली तरी येणाऱ्या काळात याची भयानकता खूप जाणवेल. सोशल मीडियात फेसबुक, व्हाॅट्स ॲप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर अशी खूप सारी माध्यमे मोडली जातात. पैकी फेसबुक आणि व्हाॅट्सॲप हे दोन सर्वांत प्रभावशाली माध्यमे आहेत. या दोन गोष्टींमुळे संपूर्ण जग मोबाईलमध्ये सामावले आहे. स्मार्ट फोन आणि हायस्पीड इंटरनेटच्या दुनियेत, जगामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यांत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण क्षणात येऊ शकतो. सुख- दुःखाचे क्षण फोटोत कैद करून इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे पाठवू शकतो. एवढ्यावरच सोशल नेटवर्किंग न थांबता, आता चालू परिस्थितीत सोशल मीडियाची व्यापकता अमर्यादित स्वरूपाची आहे. सोशल मीडिया म्हणजे तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. आज या अनेक माध्यमातून (फेसबुक, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम आदी.) आपले वैयक्तिक प्रोफाईल तयार करून प्रत्येक व्यक्ती स्वतःला व्यक्त होण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करून घेत आहे. यासाठी त्यास कोणाच्या मदतीची गरज नाही.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त होत असतानाच आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठीसुद्धा सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. आर्थिक व्यवहारासाठीदेखील या सोशल मीडियाचा वापर होऊ लागलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित लोकांना मोठा फटका बसलेला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढू लागले आहेत. याला सामान्य व्यक्तीच नाही तर पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक असे उच्चशिक्षित लोक बळी पडलेले आहेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्यांच्या मित्रांकडे पैशाची मागणी झाली, तर काही जणांना अश्लिल फोटो व व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेलिंग करण्यात आले. यातील काहीजण बदनामीमुळे पुढे येत नाहीत. अनेकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींची बँक खाती रिकामी होऊ लागली आहेत. पारंपारिक गुन्ह्यांची पद्धत बदलून त्यात ‘सायबर क्राईम’ याने पाऊल टाकले आहे. सायबर गुन्हेगार बसल्या जागी लोकांना गंडा घालण्याचे काम करीत आहेत. अलीकडे आलेली काही उदाहरणे पाहता सोशल मीडियाचा वापर करणे आता पाहिजे तितके सोपे राहिलेले नाही, हेच यातून अधोरेखित होत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने तर झालेल्या मनस्तापामुळे फेसबुकचे खाते कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दुसरीकडे मीटू ही सोशल मीडियाची पुढची पायरी म्हटलं तरी चालेल. कारण दाबून ठेवलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या मीटूने करायला सुरुवात केली आहे. तुमच्यावर अन्याय झालाय? पोलिसांत तक्रार दाखल करायची भीती वाटते? घरच्यांना सांगू शकत नाही? वरिष्ठांना सांगू शकत नाही? काही हरकत नाही, मीटू टाईप करा, संपूर्ण जग तुमच्या पाठीशी उभे आहे. आणि येणाऱ्या काळात सोशल मीडियाचे याहीपेक्षा मोठे यश असू शकेल. एकंदरीत सोशल मीडिया जितका फायद्याचा तितकाच तोट्याचादेखील आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सिद्ध झालेले आहे, त्यामुळे त्याचा वापर करताना जपूनच केला पाहिजे.