लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असते. ज्या खोलीत रुग्ण राहणार असेल त्या खोलीत हवा मोकळी हवी. खिडकी उघडी हवी. रुग्णाने पूर्ण वेळ तीन पदरी (ट्रिपल लेअर) मास्क वापरावा. हा मास्क आठ तासपर्यंत वापरू शकतात. हा मास्क परत वापरता येत नाही, अशा काही महत्त्वपूर्ण टीप्स शासकीय वैद्यकीय महााविद्यालयातील औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा.डॉ.योगिता बावस्कर यांनी दिल्या आहेत.
आजारी व्यक्तीला त्याच्याच खोलीत जेवण द्यावे, त्याची भांडी वेगळी असावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्यापासून पाचव्या दिवशी किंवा कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
या आहेत टीप्स
कोरोनाची लक्षणे सुरु झाल्यावर १० दिवसांनी व मागील ३ दिवसात ताप आला नाही तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने गृह विलगीकरण संपवू शकतो. परत कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.
- दर चार तासांनी ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान मोजावे, ९५ खाली ऑक्सिजनची पातळी असेल तर उॉक्टरांशी संपर्क करावा
- कोरोनाबाधित रुग्णाने जास्तीत जास्त आराम करावा, पाणी भरपूर प्यावे, सकस आहार, फळे खावी. कोरोनाबाधित रुग्णाने पालथे झोपावे, त्यामुळे ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते.
- दिवसातून दोन वेळा "६ मिनिट वॉक टेस्ट" करावी. आधी ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजावे, मग ६ मिनिटे खोलीत चालावे, त्यानंतर परत सॅच्युरेशन मोजावी. जर सॅच्यूरेशन ९४ पेक्षा कमी किंवा आधीच्या नोंदीपेक्षा ३ अंकाने कमी झाले तर डॉक्टरना त्वरित संपर्क करून दवाखान्यात दाखल व्हावे.