जळगाव : अनेक बंधने घालूनही काही रिकामटेकड्या अन् अतिउत्साही तरूणांना आवर घालता येत नसल्याने प्रशासनाने आता अत्यावश्यक सेवांसाठीच पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पेट्रोलपंपावर रिकामटेकड्या अन् फिरस्त्या तरूणांकडून वाद घालण्याचे प्रकार घडत आहे.जमावबंदी अन् आता संचारबंदी करूनही अतिउत्साही अन् रिकामटेकड्या तरूणांची फिरस्ती अन् उगाचच रस्त्यावर वाहने घेऊन फेरफटका मारणे थांबलेले नाही. पोलिसांनी आता कारवाईचे पाश आणखीन आवळले असले तरी काही भागांमध्ये कारण नसतानाही दुचाकी, चारचाकी वाहनांवरून फेरफटका मारण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचे पुढचे पाऊल टाकत आता अत्यावश्यक सेवांनाच पेट्रोल मिळेल, असे बंधन घातले आहे. ओळखपत्र असेल तरच या सेवांनाही पेट्रोल मिळणार आहे. उर्वरित लोकांना ते मिळणार नसल्याने आता या रिकामटेकड्या तरूणांच्या दुचाकी घरी थांबतील, असा प्रशासनाला विश्वास आहे.दरम्यान, प्रशासनाने घातलेले हे बंधन तरूणांच्या जिव्हारी लागले असून त्यामुळे पेट्रोलपंपावर वाद होऊ लागले आहेत. पेट्रोल देणाऱ्या कर्मचाºयाशी सर्रास हुज्जत घातली जात आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावर पोलिस संरक्षण देण्याची मागणी आता करण्यात येत आहे.
रिकामटेकड्यांचा पेट्रोल पंपावर वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:41 PM