लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले होते, मात्र, १८ ते २९ वयोगटाच्या लसीकरणाची प्रतिक्षा होती. अखेर २२ जून पासून या वयोगटाचे लसीकरणही सुरू करण्याच्या सूचना राज्यपातळीवरून आल्या असून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी सोमवारी कोविशिल्ड लसीचे २१ हजार डोस प्राप्त झाले असून त्यातील ४ हजार डोस हे शहरासाठी देण्यात आले आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद होते. ते दोन टप्प्यात सुरू करण्यात आले. सुरूवातीला १९ जूनपासून ३० ते ४४ वयोगटाचे तर आता २२ जून पासून १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. यात ग्रामीण भागात सरसकट थेट केंद्रांवर जावून नोंदणी करता येणार आहे. तर शहरातील केंद्रांवर ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी सुविधा राहणार आहे. दरम्यान, लस उपलब्ध नसल्याने गेली दोन दिवस शहरातील केंद्र बंद होती. मात्र, आता केंद्रांवर गर्दी वाढणार आहे. १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण शासकीय व खासगी अशा दोनही यंत्रणेत सुरू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. शहरातील केंद्रांनाही लस उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे आदेश रात्री उशीरा प्राप्त झाले. रात्री उशीरा महापालिकेच्या केंद्रांचे नियोजन सुरू होते.
असे आहे लसींचे वाटप
जिल्ह्यासाठी सोमवारी २१ हजार ५०० कोविशिल्ड तर ३ हजार कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले आहेत. यातील २ हजार डोस हे महापालिकेच्या केंद्रांसाठी तर २ हजार डोस हे रोटरी व रेडक्रॉस या केंद्रांना देण्यात आले आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनही केवळ दुसऱ्या डोससाठी राखीव राहणार आहे. यात शहरासाठी कोव्हॅक्सिनचे २७७० डोस देण्यात आले आहेत. रोटरी भवन येथे कोव्हॅक्सिन उपलब्ध राहणार आहे.