लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात शुक्रवारीही महापालिकेच्या ५ केंद्रांवर केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे. या पाचही केंद्रांवर केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत कोविशिल्ड लसीचे आणखी २३०० डोस जिल्हाला प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.
शहरातील शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, कांताई नेत्रालय, शाहीर अमरशेख आणि नानीबाई रुग्णालय या पाच केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली आहे.
पुढील निर्देशापर्यंत आता केवळ दुसरा डोस
१८ ते ४४ वयोगटाबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त होईपर्यंत जिल्ह्यात केवळ ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसरा डोसचेच लसीकरण सुरू रहाणार असल्याची माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली. यासह येत्या शुक्रवार, शनिवारपर्यंत जिल्ह्यात कोव्हॅक्सिन उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.