लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या १८ ते ४४ या वयोगटापैकी आता त्यातील ३० ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्याच्या सूचना आरोग्य संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी शहरातील ७ केंद्रासह जिल्ह्यात ८ केंद्रांवर या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे यात ऑनलाइन नोंदणी गरजेची नसून थेट केंद्रांवरच नोंदणी होणार आहे.
लस उपलब्धतेनुसार पहिला डोस मिळणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, सर्वांना लस उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. डॉ.अर्चना पाटील यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याबाबत सूचना दिल्यानुसार या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
ऑनलाइन नोंदणीतून सुटका
१८ ते ४४ वयोगटासाठी सुरुवातीला ऑनलाइन केंद्र निवडल्यानंतरच लस उपलब्ध होत होती. मात्र, आता हा निकष हटविण्यात आला असून ३० ते ४४ वयोगटासाठी आता थेट केंद्रांवर जाऊन नोंदणी करून लस घेता येणार आहे.
या केंद्रांवर मिळणार लस
३० ते ४४ वयोगटासाठी शहरातील छत्रपती शाहू हॉस्पीटल, डी.बी.जैन हॉस्पीटल, शाहीर अमरशेख हॉस्पिटल, कांताई नेत्रालय, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, रोटरी भवन, रेडक्रॉस रक्तपेढी यासह चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयात पहिला डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येकाला लस मिळणार असून नागरिकांनी अचानक केंद्रांवर गर्दी करू, नये असे आवाहन प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
२७ हजार कोविशिल्ड जिल्ह्यात शिल्लक
लसीचे मोठ्या प्रमाणावर कोविशिल्ड लसीचे डोस शिल्लक असतानाही शुक्रवारी केवळ ७८० लाभार्थ्यांनी पहिला तर ३१७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. दरम्यान, प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर २७ हजार ९७० कोविशिल्ड तर ३९० कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत. यात जळगाव शहरात २३५० कोविशिल्ड तर १०० कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोट
१८ ते ३० हा वयोगट तरुण असल्याने त्यांची प्रतिकारक्षमता अधिक असते. त्या तुलनेत ३० ते ४४ या वयोगटात अन्य व्याधी असलेल्यांची संख्याही अधिक असते, त्यामुळे त्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा शासनाचा विचार असल्याने या गटाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.