लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९ महिने लहान बालकांचे विविध लसीकरण ठप्प होते. मात्र, महापालिकेच्या यंत्रणेत ते काहीच कालावधीसाठी बंद राहिले, गेल्या ११ महिन्यांच्या काळात शहरातील ७० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले असून मार्च पर्यंत पूर्ण बालकांना विविध लस दिल्या जातील असा विश्वास महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय एप्रिलपासून पूर्णत: कोविडवर उपचार सुरू झाल्यामुळे या ठिकाणच्या अन्य वैद्यकीय सेवा दुसरीकडे वळविण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे लहान बालकांचे लसीकरण ठप्प झाले होते. नऊ महिन्यानंतर जानेवारीत ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात मात्र, कोणताच बालक कोरोनामुळे लसीकरणापासून वंचित राहीला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे. तर शहरातही कोरोना काळातही लसीकरणाची सेवा सुरूच होती, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.
कधी कोणती लस आवश्यक
जन्मानंतर २४ तासांच्या आत : बीसीजी, हेपीटायटीस बी, ओरल पोलिओ
दीड महिन्यानंतर : पोलिओ, पेंटाव्हॅलंट, रोटाव्हायरस, इंजेक्टेबल पोलिओ
अडीच महिन्यानंतर : पेंटाव्हॅलंट, रोटाव्हायरस, पोलिओ
साडे तीन महिन्यानंतर : पोलिओ, पेंटाव्हॅलंट, रोटाव्हायरस, इंजेक्टेबल पोलिओ
नऊ महिन्यानंतर : एमआर, व्हिटॅमिन ए
पंधरा महिन्यानंतर : एमआर, ओरल पोलिओ, डीपीटी बुस्टर
लस घेण्याचे आवाहन
फेब्रुवारीपर्यंत ७० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी मार्चपर्यंतचा अवधी असतो, तोपर्यंत शंभर टक्के बालकांना लस दिली जाईल, यासाठी ज्या बालकांचे लसीकरण बाकी असेल त्यांनी महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात सोमवार आणि गुरूवारी जावून बाळांना या विविध लसी द्यावात, असे आवाहन डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
जन्मानंतर, दीड महिने, अडीच महिने, साडे तीन महिने आणि पुढे असे हे विविध लसीचे डोस असतात, या लस शासकीय यंत्रणेत उपलब्ध आहे. बालकांची विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. पालकांनी वेळेनुसार आपल्या बाळांना ही लस द्यावी. - डॉ. मिलिंद बारी, बालरोगतज्ञ
बालकांना वेळेवर विविध लस देणे हे पालकांचे कर्तव्य आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार, गुरूवार, शनिवारी या दिवशी हे लसीकरण आहे. बालकांचा विविध जीवघेण्या आजारांपासून हे लसीकरण बचाव करीत असते, त्यामुळे बालकाच्या सुदृढ आरोग्यासाठी ते शंभर टक्के आवश्यक आहे. राहिलेल्या पालकांनी बालकांना हे डोस द्यावेत - डॉ. बाळासाहेब सुरोसे, बालरोग विभाग प्रमुख जीएमसी
यंदाही पूर्णवेळ लसीकरण
साथीच्या आजारांमध्येही लसीकरण नियमीत सुरूच राहते. त्यावर परिणाम झालेला नाही, कोरोना काळातही पूर्ण लसीकरण सुरूच होते, यात खंड पडला नाही, २०१९ प्रमाणचे २०२० मध्येही लसकीकरण झाले आहे. शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयात हे लसीकरण सुरूच होते. शिवाय खासगी यंत्रणेतही हे लसीकरण सुरूच होते, अशी माहिती खासगी डॉक्टरांनी दिली.
शहरातील लसीकरण झालेली बालके ५७००
लसीकरण बाकी असलेली बालके २४००