लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लस उपलब्ध नसल्याने दोन दिवस बंद असलेली शहरातील लसीकरण केंद्र गुरुवारी लस आल्यानंतर अखेर उघडली. मात्र, यातही कोविशिल्ड लसीचा अगदीच कमी पुरवठा असल्याने चेतनदास मेहता रुग्णालयात सकाळी गर्दी झाली होती. काहीसे गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले होते. ही गर्दी टाळण्यासाठी अखेर महापालिकेने ऑनलाइन नोंदणी व केंद्र निवडलेल्यांनाच लस देण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्रावरची लस एका दिवसातच संपली.
कोविशिल्ड लसीच्या तुलनेत कोव्हॅक्सिन या लसीचा अत्यल्प पुरवठा होत आहे. या लसीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक नागरिकांना दोन महिन्यांवर दिवस उलटूनही त्यांना दुसरा डोस मिळालेला नाही. अद्यापही ही संख्या वीस हजारांवर असून, डोस आठवड्यातून एकदा १२०० अशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यातच शहरासाठी अगदीच कमी डोस मिळत आहे. यात चेतनदास मेहता रुग्णालयाला २०० डोस मिळाले होते. त्यामुळे या केंद्रावर गर्दी उसळली होती.
ऑनलाइनमुळे नागरिक परतले
चेतनदास मेहता रुग्णालयात सकाळी नागरिकांची गर्दी झाली होती. कूपन वाटप करून लसीकरण होत असेल असा समज असल्याने ही गर्दी झालेली होती. मात्र, या केंद्रावर गेल्यानंतर अनेकांना केवळ केंद्र बुक केलेल्यांना कोव्हॅक्सिन मिळेल असे समजल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली व अनेकांना येथून परत जावे लागले. यामुळे काहीसा गोंधळ झाला होता.
पिंप्राळ्यात नवे केंद्र
शहरात आता पिंप्राळा परिसरातील मनपा शाळा क्रमांक ४८ मध्ये नवीन लसीकरण केंद्र शुक्रवारपासून सुरू केले असून, यात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहेत. त्यात दुसऱ्या डोसला प्राधान्य राहणार आहे. यासह महापालिकेच्या अन्य सात व रेडक्रॉस तसेच रोटरी भवन येथेही कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे.