विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : गेल्या आठवड्यापासून सेवाग्राम एक्स्प्रेस बंद केल्यामुळे विदर्भ एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.यामुळे अनेक प्रवाशांची तिकिटे प्रतीक्षा यादीत राहत आहेत. तसेच जनरल बोगींमध्ये तर प्रवाशांना उभे राहण्यासाठी ही जागा उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये आपसात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सेवाग्राम एक्स्प्रेस बंद केल्यानंतर विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना जनजागृती मोहीम
जळगाव : जळगाव रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आदी प्रकारच्या सूचना करण्यात येत आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. तर सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही सांगण्यात येत आहे.
रेल्वेतर्फे पेन्शन अदालतीचे आयोजन
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासन तर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी १५ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने
पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पेन्शन धारकांनी आपल्या तक्रारी मंडल कार्मिक अधिकारी, भुसावळ यांच्याकडे पोस्टाने किंवा ईमेल पाठवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच अर्जासोबत आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरुप आदी माहिती पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शिवाजीनगर कडील तिकीट खिडकी सुरु करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासनातर्फे शिवाजीनगर कडील तिकीट खिडकी बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगर कडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तातडीने शिवाजीनगर कडील तिकीट खिडकी सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.