लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकारच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने १३ मे पासून अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. सध्या जिल्ह्यातील लसींचादेखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी राखीव असलेला लसींचा साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरणदेखील बुधवारी जवळपास बंदच होते.
शहरातील रेडक्रॉसच्या केंद्रावर तर लसीकरण बंद असल्याचा बोर्डच लावण्यात आला होता. चेतनदास मेहता रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि स्वाध्याय भवन येथे फक्त दुसरा डोस घ्यायला येणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात होती. लसीकरणासाठी नवीन नोंदणीदेखील आता बंद करण्यात आली आहे.
महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १३ मे रोजी स्वाध्याय भवन येथे नियोजित १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू करण्यात आलेले लसीकरणाचे सत्र राज्य शासनाच्या सुचनेनुसार काही कारणास्तव रद्द करण्यात आले आहे. तरी ज्या नागरिकांचे १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणाची नोंदणी झाली आहे त्यांनी लसीकरण पुन्हा सुरू होईल तेव्हा त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. तरी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये.
नवीन १४५०० लसींचा साठा येणार
जिल्ह्यासाठी बुधवारी किंवा गुरुवारी १४, ५०० लसींचा नवा साठा येणार आहे. या लसी कोविशिल्ड असतील आणि त्या संपूर्ण दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या लसी त्यांनाच दिल्या जातील, ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यामुळे सध्या तरी १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळणार नाही.
कोवॅक्सिनचा साठाच नाही
जिल्हा आरोग्य यंत्रणेला आता नव्याने जो लसींचा साठा येणार आहे, त्यात फक्त कोविशिल्डच आहे. त्या दुसऱ्या डोससाठी राखीव आहेत. त्यामुळे आता ज्यांना दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा घ्यायचा आहे. त्यांची अडचण झाली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने कोव्हॅक्सिन उपलब्धच नाही. त्यामुळे दुसरा डोस नागरिकांना सध्या तरी मिळु शकणार नाही.
नागरिकांच्या लागल्या रांगा, तरीही निराशा
४५ वर्षांवरील नागरिक अनेक केंद्रांवर पहाटे पाच वाजतापासून रांगा लावून बसत आहेत. त्याचप्रमाणे चेतनदास मेहता रुग्णालयात अनेकांनी पहाटे तीन -चार वाजेपासून आपला क्रमांक लावून ठेवला होता. बुधवारी सकाळी तेथे जवळपास २०० च्या वर नागरिक कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी आले होते. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश होता. त्यांनादेखील तेथून परत जावे लागले. तेथेदेखील लस उपलब्ध नसल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. ज्यादिवशी तेथे लस उपलब्ध असते त्यादिवशीदेखील हाच बोर्ड कायम असतो, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.