लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे फक्त ४०० डोस शिल्लक आहेत. त्यामुळे मंगळवारपाठोपाठ बुधवारीदेखील जिल्ह्यातील लसीकरण बंदच राहणार आहे. सध्या शिल्लक असलेल्या चारशेपैकी तीनशे डोस कोविशिल्डचे तर शंभर डोस कोव्हॅक्सिनचे आहेत. बुधवारी जिल्ह्याला ४ हजार ७०० कोविशिल्ड आणि सुमारे दोन हजार कोव्हॅक्सिनचे डोस मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाच्या मोहिमेला गेल्या दोन दिवसांपासून मोठी खीळ बसली आहे. जिल्ह्यात सर्वत्र लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसींचा तुटवडा पाहता राज्य शासनाने फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले. मात्र, जळगाव जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांनादेखील पुरणार नाही, इतके कमी डोस जिल्ह्याला मिळत आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे ३०० कोविशिल्ड आणि १०० कोव्हॅक्सिन असे चारशे डोस शिल्लक आहेत. त्यातील कोविशिल्डचे १४० डोस हे जिल्हा रुग्णालयाकडे आहेत. तर भुसावळला ८० सावद्यात ४०, वरणगावला १० आणि अमळगाव ग्रामीण रुग्णालयात ३० डोस शिल्लक आहेत. तर कोवॅक्सिनचे ९० डोस पारोळ्यात आणि अमळनेर झामी चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात १० डोस शिल्लक आहेत. बाकी सर्व लसीकरण केंद्रांवर ठणठणाट आहे. जळगाव महापालिकेच्या एकाही लसीकरण केंद्रावर बुधवारी लस मिळण्याची शक्यता नाही.
मंगळवारी फक्त ४७७ जणांना मिळाली लस
मंगळवारी दिवसभरात फक्त ४७७ जणांना लसीचा डोस मिळाला आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये भुसावळला ६९, पाचोऱ्यात ४४, रावेरला ११८, जळगावला १६६ जणांना लस मिळाली तर दुसऱ्या डोसमध्ये अमळनेरला २२, भडगावला १५, पारोळ्यात ४१, जळगावला फक्त दोन जणांना लस मिळाली आहे. त्याशिवाय इतर तालुक्यांमध्ये ठणठणाट होता.
फक्त ४०० डोस शिल्लक
जिल्ह्यात मंगळवारी अनेक केंद्रांवर लसच शिल्लक नव्हती. तर बुधवारीदेखील दिवसभर लसीकरण केंद्रांना लस मिळण्याची शक्यता कमीच आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सायंकाळपर्यंत फक्त ४०० डोस शिल्लक होते. तर नवीन ६७०० डोस हे बुधवारी सायंकाळपर्यंत जळगावला येतील. त्यानंतर ते वितरीत केले जातील.
कोट
कोविशिल्डचे ४७०० डोस मिळणार
जिल्ह्यात सध्या लसींचे ४०० डोस शिल्लक आहेत. बुधवारी जिल्ह्याला ४७०० कोविशिल्डचे डोस मिळणार आहेत. कोव्हॅक्सिनचे डोसदेखील मिळणार आहेत.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.
मनपाकडे लस शिल्लक नसल्याने बुधवारी लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. : -डाॅ. राम रावलाणी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, मनपा.