लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारी जिल्ह्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ लाख ४ हजार नागरिकांनी लस घेतली होती. तर दुसरीकडे जिल्हाभरात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने दिलासादायक स्थिती होती. जिल्ह्यात या आधी एकाच दिवसात १ लाख १८ हजार नागरिकांनी लस घेतल्याचा विक्रम होता.
जिल्ह्याला शुक्रवारी २ लाख डोस प्राप्त झाल्यानंतर शनिवारी यातून लसीकरणाचे २५६ सत्र आयोजित करण्यात आले होते. यात जळगाव शहरातील सर्वच केंद्रांवर लस उपलब्ध होती व गर्दी झालेली होती.
दुपारी गर्दी
दिवसभरात दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास सर्वाधिक ३० हजार लोकांनी लस घेतली. सकाळी ९ वाजेपासून लसीकरणाला प्रारंभ झाला होता. तर सायंकाळी हा आलेख खाली उतरला होता. सायंकाळी ७ वाजता ५ हजार नागरिकांनी लस घेतली. असे दिवसभरात हे लसीकरण वाढून १ लाख ४ हजारांपर्यंत पोहचले. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती.
शहरातील तीन रुग्ण झाले बरे
शनिवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. तीन रुग्ण बरे झाले असून हे तीनही रुग्ण जळगाव शहरातील असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या घटून ८ वर पोहोचली आहे. शनिवारी आरटीपीसीआरचे ३३९ अहवाल प्राप्त झाले तर ३८७ ॲंटिजन चाचण्या करण्यात आल्या. यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात १७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १६ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.