एरंडोल : तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे दिसून येते. मात्र, अजूनही धोका कायम असल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. लसींचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण मोहिमेला पाहिजे तेवढी गती मिळत नाही. लसीकरण ठप्प झाल्यामुळे लसींसाठी नागरिक लसीकरण केंद्रावर चौकशीसाठी पायपीट करताना दिसत आहेत.
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात बुधवार, २६ मे रोजी १४ रुग्ण उपचार घेत आहेत व आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये ४ रुग्ण दाखल आहेत. शहरातील २ खाजगी कोविड केअर सेंटरमध्ये १५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर शहरात १ नवा रुग्ण व ग्रामीण भागात २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात कासोदा, तळई व रिंगणगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व काही उपकेंद्रांमध्ये लस उपलब्ध झाल्यावर लसीकरणाचे काम केले जाते. लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण पाहता लसीकरण मोहिमेला अधिक वेग देणे गरजेचे आहे. दुसरी लाट ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वेगाने करण्याचा लाभ घेतला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.
तालुक्याचा पॉझिटिव्ह रेट बऱ्यापैकी कमी झाला आहे. रिकव्हरी रेट ९५ टक्केपर्यंत पोहोचला आहे. विशेष हे की जळगाव जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा एरंडोल तालुक्याचा रिकव्हरी रेट २ ने जास्त आहे. बुधवारअखेर एकूण १२७ ॲक्टिव्ह केसेस आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ६,६८६ असून त्यापैकी ६,३३० रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांची घरवापसी झाली आहे.
एरंडोलसह ग्रामीण भागात लॉकडाऊन काळात नागरिकांनी नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. याशिवाय, लसीकरणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असतील, त्यांनी आधी तपासणी करून उपचार करून घ्यावा, जेणेकरून कोरोनाचा लढा जिंकण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल.
- डॉ. फिरोज शेख, तालुका आरोग्य अधिकारी, एरंडोल
एरंडोल तालुका
लोकसंख्या : १ लाख ६६ हजार
१८ वर्षांवरील नागरिक : १ लाख १६ हजार २००
कोरोना लसीचा पहिला डोस : १० हजार ५१६
कोरोना लसीचा दुसरा डोस : ३६५६
एकूण डोस १४ हजार १७२
एरंडोल शहर
लोकसंख्या : ३७ हजार ९२९
कोरोना लसीचा पहिला डोस ११ टक्के
कोरोना लसीचा दुसरा डोस ४ टक्के